भारतीय लष्करातून सेवानिवृत्त झालेले रामेश्वर वायाळ यांचा चिंचखेड ग्रामस्थांच्यावतीने गौरव सोहळा!
देऊळगावराजा (राजेंद्र डोईफोडे) – तालुक्यातील चिंचखेड गावाचे भूमिपुत्र तथा भारतीय लष्करातील हवालदार या हुद्द्यावरून सेवानिवृत्त झालेले रामेश्वर ओंकारराव वायाळ यांचा ग्रामस्थांच्यावतीने भावपूर्ण गौरव सोहळा साजरा करण्यात आला. यानिमित्त देऊळगावमही गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली, तसेच रात्री हरिकीर्तनही पार पडले. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ न्यूज मीडिया ग्रूपचे संपादकीय संचालक तथा स्वराज्य शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष व मुख्याध्यापक संघ तालुका देऊळगावराजाचे अध्यक्ष शिवश्री प्रवीण सुधाकर मिसाळ यांनी त्यांचे छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला.
वर्ष २००२ मध्ये रामेश्वर ओंकारराव वायाळ हे भारतीय लष्करात सामील झाले होते. मराठा रेजिमेंटमध्ये त्यांनी दैदीप्यमान कामगिरी बजावली. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, आसाम, संयुक्त राष्ट्रे (यूएन)च्या लष्करी मोहिमेत सुदान देशात त्यांनी कामगिरी बजावली. कारगीलमध्येही त्यांनी विशेष कामगिरी बजावली होती. केदार, बद्रीनाथ धाम येथील हिंदू भाविकांची दर्शन व्यवस्था सुरूळीत करण्याच्या नियोजनातही त्यांनी आपले विशेष योगदान दिले होते. त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांचा लष्कराकडून गौरवदेखील झालेला आहे. त्यांच्या लष्करी सेवेतील सेवानिवृत्तीनिमित्त चिंचखेड (ता.देऊळगावराजा) ग्रामस्थांनी रविवारी (दि.२) भव्य गौरव सोहळा आयोजित केला होता. तसेच, देऊळगावमही गावातून त्यांनी मिरवणूक काढून रात्री हरिकीर्तनदेखील पार पडले. तसेच, उपस्थितांनी भोजनही देण्यात आले. यासाठी त्यांचे बंधू शरद ओंकारराव वायाळ व चिंचखेड ग्रामस्थांसह कै.भास्कररावजी शिंगणे हायस्कूल मंडपगाव-चिंचखेड, मंडपगाव, सुलतानपूर ग्रामस्थांनी पुढाकार घेतला होता. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ परिवाराच्यावतीने संपादकीय संचालक तथा आदर्श मुख्याध्यापक शिवश्री प्रवीण मिसाळ यांनी या सेवापूर्ती सोहळ्यास उपस्थित राहून रामेश्वर ओंकारराव वायाळ यांना शुभेच्छा दिल्यात.
——————-