प्रभारी नायब तहसीलदारांनी करून दाखवले!; दोन दिवसांत विद्यार्थ्यांची जातप्रमाणपत्रे निघाले निकाली!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – सिंदखेडराजा तालुक्यातील प्रलंबित असलेले जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला व इतर शैक्षणिक दाखले दोन दिवसांत मार्गी लावल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, याप्रश्नी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे साखरखेर्डा प्रतिनिधी तथा वरिष्ठ पत्रकार अशोक इंगळे यांनी सडेतोड वृत्त प्रकाशित केले होते. त्याची गांभीर्याने दखल महसूल प्रशासनाने घेतली. तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी प्रभारी नायब तहसीलदार म्हणून संदीप बंगाळे यांची नियुक्ती केली. बंगाळे यांना कामाचा प्रदीर्घ अनुभव पाहता, त्यांनी शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी दोन दिवसात दाखले निकाली काढून पुढील कारवाईसाठी उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांच्या कार्यालयात वर्ग केले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची अडचण पाहता, उपविभागीय अधिकारी खडसे यांनी जात प्रमाणपत्र वितरित करुन विद्यार्थ्यांचा मार्ग मोकळा केला.
जात प्रमाणपत्र मार्गी लावण्यासाठी सिंदखेडराजा तहसील कार्यालयात प्रभारी नायब तहसीलदार म्हणून एन. टी. ढवळे यांची नियुक्ती केली होती. परंतु, ढवळे यांनी जात प्रमाणपत्र व इतर शैक्षणिक दाखले देण्यास नकार दिल्याने एक हजार दाखले प्रलंबित होते. ते दाखले १० वीच्या निकालापूर्वी विद्यार्थ्यांना मिळावीत म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राम जाधव यांनी तहसीलदार प्रवीण धानोरकर आणि उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांना प्रत्यक्ष भेटून जात प्रमाणपत्र निकाली काढण्यासाठी सक्षम अधिकार्यांची नियुक्ती करावी अशी मागणी केली होती. त्याची तत्काळ दखल घेऊन तहसीलदार प्रविण धानोरकर यांनी प्रभारी नायब तहसीलदार म्हणून संदीप बंगाळे यांची नियुक्ती केली. बंगाळे यांना कामाचा प्रदीर्घ अनुभव पाहता, त्यांनी शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी दोन दिवसात दाखले निकाली काढून पुढील कारवाईसाठी उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांच्या कार्यालयात वर्ग केले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची अडचण पाहता उपविभागीय अधिकारी खडसे यांनी जात प्रमाणपत्र वितरित करुन विद्यार्थ्यांचा मार्ग मोकळा केला.
शालेय विद्यार्थ्यांचे वर्ग दहावी व बारावीचे निकाल लागले असून, विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक सोयीसाठी उत्पन्नाचा दाखला तसेच जात प्रमाणपत्र काढण्यासाठी हेलपाटे मारावी लागत असे. साखरखेर्डा परिसरातील विद्यार्थ्यांना सिदखेडराजा येथे जाण्यासाठीचे अंतर ६० किलोमीटरचे असून, विद्यार्थ्यांना नाहक हेलपाटे मारावे लागत होते. परंतु, या ठिकाणी प्रभारी नायब तहसीलदार म्हणून संदीप बंगाळे यांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांनी चार्ज घेताच गेल्या दोन दिवसात आठशे प्रमाणपत्र निकाली काढण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीत जातप्रमाणपत्र आणि इतर दाखले ८५० पेंडिंग होते, माझ्याकडे प्रभार येताच रात्रीचा दिवस करून विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता सर्व कामे मार्गी लावल्याने आजरोजी एकही प्रमाणपत्र पेंडिंग नाही.
– संदीप बंगाळे, प्रभारी निवासी नायब तहसीलदार, सिंदखेडराजा