– चिखली परिसरातील गावे उदयनगरमध्ये समाविष्ट करणे ठरणार अडचणीचे, महावितरणने निर्णय बदलावा, अन्यथी तीव्र आंदोलन – सरनाईक
चिखली (महेंद्र हिवाळे) – चिखली उपविभागामधे येत असलेल्या चिखली ग्रामीण शाखा- १ मधील १६ गावांचा नवनिर्मित उदयनगर (उंद्री) उपविभागामधे समावेश करणार असल्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. परंतु या प्रकरणी अनेक ग्रामपंचायतींनी आमची गावे जै थे ठेवा हा निर्णय आमच्यासाठी अडचणीचा आहे. आम्हाला भविष्यात ३० ते ४० किलोमीटर अंतर जावून लाईन संदर्भातील कामे करावी लागणार असल्याने अनेक ग्रामपंचायत सरपंचांनी या निर्णयाला हरकत घेतली, तर यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी चिखली तालुक्यातील सरपंच, उपसरपंच यांच्यासह महावितरणचे अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांची भेट घेत, सदरील १६ गावे चिखली परिसरातील असल्याने यांचा समावेश उदयनगर उपविभागामधे करण्यात येवू नये, अन्यथा ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा सज्जड इशारा दिला आहे. यावेळी सरनाईक यांच्यासह सरपंच व सरपंच प्रतिनिधी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावर ग्राहकांच्या हिताचा योग्य निर्णय घेवू, असे आश्वासन अधीक्षक अभियंता श्री कटके व कार्यकारी अभियंता श्री चव्हाण यांनी दिले आहे.
चिखली ग्रामीण-१ हे शाखा कार्यालय नवनिर्मीत उदयनगर (उंद्री) उपविभागामधे समाविष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी चिखली तालुक्यातील खंडाळा मकरध्वज, भालगाव, कोलारा, मुंगसरी, आंबाशी, एकलारा, काटोडा, खैरो, रानअंत्री, शेलगाव जहागीर, आमखेड, भोरसा भोरसी, पाटोदा, कवठळ, चंदनपूर, गांगलगाव, देवदरी या गावांचा समावेश चिखली उपविभाग मधे होता. तर या गावातील ग्राहकांना चिखली उपविभाग सोयीस्कर पडत होता. तर चिखली तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्राहक महावितरणचे कामेदेखील सहज पध्दतीने करीत होते. तहसील कार्यालय हे चिखलीत असल्याने अनेक महावितरणचे कामेही तहसीलच्या माध्यमातून होतात. विशेष म्हणजे, या गावाची बाजार पेठसुद्धा चिखली आहे. परंतु वरील गावांचा आपण उदयनगर उपविभागामध्ये समावेश करणार असल्याने यातील अनेक गावतील ग्राहक शेतकर्यांना त्यांच्या लाईनच्या कामासाठी अनेकांना ३० ते ४० किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. विशेष म्हणजे, ही सर्व १६ गावे चिखलीपासून २० किलोमीटर अंतरच्या आतील आहे. चिखली उपविभागतून सदर चिखली शाखा-१ उदयनगरमध्ये समावेश करणे ही बाब महावितरण कार्यालय चिखली व शेतकर्यांसाठी अडचणीची ठरणार असल्याने व याला ग्राहकांचा विरोधदेखील आहे. सदरील १६ गावे पूर्वीप्रमाणे जै से थेच ठेवण्यात यावी, या गावाव्यतिरिक्त उदयनगर परिसरातीलच गावांंचा त्या उपविभागामध्ये समावेश असावा जेणेकरून त्या ग्राहकांना त्यांचा फायदा होईल, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक, पाटोदा गावाचे सरपंच प्रदीप सोळंकी, एकलाराचे सरपंच गजानन आंभोरे, आमखेडचे सरपंच जगन्नाथ वाघ, शेलगाव जहागीरचे सरपंच अरुण सरनाईक यांच्यासह आदि सरपंच यांनी अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन केली आहे. याबाबत अधीक्षक अभियंत्यांशी सविस्तर चर्चादेखील करण्यात आली. ग्राहक संख्या वाढली परंतु याचे डिव्हाडेशन योग्य पध्दतीने व्हावे, या संदर्भातदेखील चर्चा करण्यात आली. दरम्यान योग्य निर्णय महावितरणकडून घेऊ, ग्राहकांना अडचणीचा होईल, असा निर्णय घेणार नाही तर आपली मागणी न्याय्य असल्याने योग्य निर्णय यावर घेणार असल्याचे आश्वासन अधीक्षक अभियंत्यांनी दिले आहे.
अनेक ग्रामपंचायतींनी नोंदवल्या हरकती
चिखली उपविभागातील गावे उदयनगर मध्ये टाकणे ही बाब ग्राहकांवर अन्याय करणारी व भविष्यात त्रासदायक ठरणार असल्याने चिखली परिसरातील खंडाळा, मकरध्वज, शेलगाव ज, भोरसा भोरसी, पाटोदा, एकलारा, कोलारा व भालगाव यासह इतर गावांनी ग्रामपंचायतीचे हरकत ठराव घेतले आहे.
महावितरणही म्हणते हा निर्णय भौगोलिकदृष्ट्या अडचणीचा!
या निर्णयावर ग्रामपंचायत सरपंचांनी हरकत ठराव घेतल्यानंतर याबाबत चिखली उपविभागाचे उपअभियंता यांना रोषाला सामोरे जावे लागत असल्याने व भविष्यात निर्णय अडचणीचा ठरणार असल्याने भौगोलिकदृष्ट्या ही बाब महावितरणच्या दृष्टीने अडचणीचे असल्याचे बुलढाणा महावितरण कार्यालयास कळविले आहे. तर यास स्थानिक लोकप्रतिनिधी यांचासुद्धा विरोध असल्याचे पत्रात नमूद आहे.
उदयनगर नवीन उपविभाग स्थापन
उदयनगर नवीन महावितरणचा उपविभाग झाला आहे. ही बाब तालुक्यासाठी आनंदाचीच आहे. परंतु कुठलेही नियोजन करतांना परिसर बघूनच निर्णय घेतला पाहिजे. मात्र आमचे चिखली परिसरातील १६ गावे पूर्वी चिखलीमध्ये होती. ती गावे जवळचा उपविभाग सोडून लांब हलवणे म्हणजे आम्हा ग्राहकांना लाईन कामासाठी भविष्यात अडचणीचा ठरणारा विषय आहे. आम्ही महावितरणला योग्य निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी केली आहे. तर ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी परिसरातील गावांचाच समावेश ज्या त्या विभागात व्हावा, उदयनगर उपविभागात त्याच परिसरातील गावे घेण्यात यावी, आणि चिखलीमध्ये चिखली परिसरातील गावे जावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. आमचा विरोध हा नवीन उपविभाग झाला याला नसून, आमचा विरोध आमची गावे चिखली विभागातून उदयनगर टाकण्याला आहे, असे सरपंच व विनायक सरनाईक यांची भूमिका आहे.