चिखली (एकनाथ माळेकर) – चिखली व सिंदखेडराजा तालुक्यात चोरट्यामार्गाने गुटखा उपलब्ध होत असून, या गुटखातस्करांना कुणाचा वरदहस्त आहे? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत गुजरी चौकामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि साखरखेडा पोलिसांनी छापा मारून १९ जुलै रोजी एका घरातून दहा लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. गुटखाबंदीबाबत कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषधी प्रशासन विभागाला असताना, व मोठ्या प्रमाणात गुटखा उपलब्ध होत असताना, हा विभाग करतो काय, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झालेला आहे.
साखरखेर्डा येथे एका घरात गुटखा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा व साखरखेर्डा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी गुजरी चौकात सापळा रचून शेख चांद शेख यासीन याच्या घरावर छापा मारला असता, दहा लाख सात हजार तीनशे रुपयाचा अवैद्य गुटखा आढळून आला आहे शेख वसीम शेख चांद, शेख इम्रान शेख चांद यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत साखरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे, पोलीस उपनिरीक्षक मनिष गावंडे, पोलीस उपनिरीक्षक अमित वानखेडे, गणेश पाटील, पोलिस कॉन्स्टेबल गजानन गोरले, पोलीस कॉन्स्टेबल पोफळे, महिला पोलीस अनुराधा उबरहंडे यांचा समावेश होता.
सुगंधी तंबाखु, गुटखा यांची तस्करी थांबणार कधी?
चिखली, सिंदखेडराजा, देऊळगावराजा या तालुक्यांत सुगंधी तंबाखु, गुटखा सर्रास चोरट्यामार्गाने मिळत आहे. हा गुटखा औरंगाबाद, नाशिकमार्गे येत असल्याची माहिती या धंद्यातील जाणकार नाव उघड न करण्याच्या अटीवर देत आहेत. मुंबईपासून ते अकोल्यापर्यंत अनेक अधिकारी या गुटखातस्करांनी मालामाल केल्याची माहितीही या सूत्राने गोपनीयपणे दिली आहे. त्यामुळे साखरखेर्डा पोलिसांनी गुटखा पकडून एकप्रकारे या गुटखातस्करांना आव्हान दिल्याचे बोलले जात आहे. गुटखाविक्री व तस्करी रोखण्याची कारवाई करण्याचे अधिकार पोलिस व अन्न आणि औषधी प्रशासन विभागाला आहे, त्यामुळे ते अधिकारी काय करतात, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
————————–