वाळूतस्करांना महसूल विभागाचा दणका; निमगाव वायाळ येथे रेती वाहतूक करणारे रस्ते जेसीबीच्या सहाय्याने उखडले!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – सिंदखेडराजा तालुक्यातील ताडशिवणी, राहेरी बुद्रूक, दुसरबीड, निमगाव वायाळ, हिवरखेड पूर्णा या गावांमधून रात्रंदिवस अवैध रेतीउपसा जोरात सुरू असून, महसूल विभागाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. राहेरी बुद्रूक या गावामधून पातळगंगा व नागपूर डाकलाईन व भगवती मंदिर वरती असलेल्या शेतामधून शेतकरी आपल्या शेतामधून वाळूतस्करांची वाहने सोडण्याकरिता प्रतिवाहन पाचशे रुपये घेत असल्याचेही दिसून येत आहे, याबाबतचे सडेतोड वृत्त ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने प्रसारित केल्यानंतर त्याची गंभीर दखल महसूल प्रशासनाने घेत, आज निमगाव वायाळ येथून रेतीतस्करी केले जात असलेले रस्ते महसूल प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने उखडून टाकले आहेत. तसेच, रेतीतस्करांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असे प्रशासनाने ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ला कळवले आहे. विशेष म्हणजे, सिंदखेडराजा-देऊळगावराजा तालुका विकास संघर्ष समितीच्यावतीनेही उपविभागीय अधिकारी प्रा. खडसे यांना सविस्तर निवेदन देण्यात आले होते.
‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या वृत्तानंतर महसूल प्रशासन खडबडून जागे झाले असून, त्यांनी रेतीतस्करांविरोधात कारवाई हाती घेतली. परंतु, याची खबर लीक झाल्याने रेतीतस्करांनी आपली वाहने लपवून ठेवली होती. त्यानंतर महसूल प्रशासनाने निमगाव वायाळ येथून रेती वाहतूक चालत असलेले रस्तेच जेसीबीच्या सहाय्याने फोडून उखडून टाकले. ताडशिवणी, राहेरी बुद्रूक, दुसरबीड, निमगाव वायाळ, हिवरखेड पूर्णा या गावांमधून रात्रंदिवस अवैध रेतीउपसा जोरात सुरू असून, महसूल विभागाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. निमगाव वायाळ, ताडशिवणी या गावातून अवैध रेतीवाहतूक करणारे टिप्परवाले उघडपणे रेतीउपसा करत असून, ही माहिती स्थानिक तलाठी टेकाळे व दुसरबीड येथील मंडळ अधिकारी पदाचा कारभार असलेले राहुल देशमुख व सिंदखेडराजा येथील महसूल विभागातील अधिकारी यांना फोन व व्हाटसअपद्वारे दिली असता, ते काहीही कारवाई करत नाही. त्यामुळे या अधिकार्यांच्या संगनमताने सदरची वाळूतस्करी सुरू असल्याचा दाट संशय सिंदखेडराजा-देऊळगावराजा तालुका विकास संघर्ष समितीने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आला होता. तसेच, या अधिकार्यांच्या खातेनिहाय चौकशीची मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर महसूल विभागाने रेतीतस्करांविरोधात कठोर कारवाई हाती घेतली होती. कोणत्याही परिस्थितीत अवैध रेतीतस्करी होणार नाही, अशी ग्वाही महसूल विभागाच्या अधिकार्यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ला दिली आहे.
———-