आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीला जलपर्णीच्या विळखा पडल्याने नद्यांचे पावित्र्य जतनासाठी तसेच इंद्रायणी नदीचे प्रदूषण मुक्तीसाठी एक पाऊल भावी पिठीसाठीचा संदेश देत इंद्रायणी नदी उगम तें संगम प्रदूषण मुक्तीसाठी इंद्रायणी परिक्रमा अंतर्गत घाटावर इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यासाठी विविध सेवाभावी संस्था जनजागृतीसह स्वच्छता सेवा कार्य करीत आहेत. मात्र पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून इंद्रायणी नदीतील जलपर्णी नदी पात्रातून बाहेर काढण्याचे कार्य सुरु असून ते संथ गतीने सुरु आहे. अवघ्या ५७ दिवसावर आळंदीतून पंढरीस लाखो भाविक वारकरी यांचे उपस्थितीत माऊलींचे पालखी सोहळ्याचे प्रस्थान २९ जून ला आळंदी मंदिरातून होणार आहे. येथील इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्याचे उपाय योजनेस गती देऊन भाविकांचे श्रद्धास्थान स्वच्छ तसेच प्रदूषण मुक्त इंद्रायणी नदी राहावी. यासाठी प्राधान्याने कामकाज करण्याची मागणी आळंदी जनहित फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.
इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानचे आयोजन आळंदी नगरपरिषद व नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान,आळंदी जनहित फाउंडेशन, श्री आळंदी धाम सेवा समितीसह विविध सेवाभावी संस्थांचे सहकार्याने केले जात आहे. रानजाई प्रकल्प देहूचे प्रमुख सोमनाथ आबा मुसुडगे यांचे मार्गदर्शनात देहू येथे इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानात विविध संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक,कार्यकर्ते, आळंदी ग्रामस्थ सहभागी होत असतात. आळंदी येथील इंद्रायणी नदी वरील पाणी साठवण बंधारा येथे जलपर्णी पुढे ढकलण्याचे काम सुरु असून पुढील पात्रात जलपर्णी साचलेली आहे. मागील वर्षीची जलपर्णी कुजून कचऱ्याचा ढीग इंद्रायणी नदी पात्रात तसाच पडून असून कचरा आणि राडा रपदा यामुळे नदीचे पात्र उधळ झाले आहे. पूर्वी प्रमाणे नदीचे पात्र खोल व पाणीयुक्त राहावे यासाठी नदीचे किनारे स्वच्छ करून नदी पात्रातील राडा रोडा, गाळ, कचरा काढण्याचे कामास गती देण्याची आवश्यकता आहे. आळंदी येथील स्मशान भूमी समोरील इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यासह परिसरात असलेले कचऱ्याचे साम्राज्य दूर करण्याची मागणी प्रवासी भाविक व्यक्त करीत आहेत. उगम ते संगम इंद्रायणी नदी जलपर्णी मुक्त करण्याची परिसरातील नागरीकांची मागणी असून अधिक गतीने काम करण्याची गरज भाविकांनी व्यक्त केली. डुडुळगावं परिसरात पुढील काही दिवस काम करण्यात येणार आहे. त्यानंतर चिंबळी बंधारा ,केळगाव,आळंदी बंधारा नदी घाटावर जलपर्णी काढण्याचे काम सुरु आहे. मात्र पावसाळा आणि आळंदी येथील पालखी सोहळ्याचे प्रस्थान याचा विचार करून पालखी सोहळ्यापूर्वी इंद्रायणी नदी परिसर स्वच्छ, जलपर्णी मुक्त आणि इंद्रायणी नदी वरील पुलाचे आळंदी असलेले दुतर्फ़ा सबवे वारकरी, भाविक, नागरिकांना सुरक्षित ये जा करण्यास स्वच्छता, देखभाल दुरुस्ती करून वापर योग्य ठेवण्याची मागणी आळंदी जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील यांनी केली आहे. प्रदूषण मुक्त इंद्रायणी नदीसाठी काम करण्यासाठी नदी स्वच्छता अभियानात सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी केले आहे.
या संदर्भात आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे म्हणाले, पालखी सोहळा आणि येणार पावसाळा यादृष्टीने विविध नागरी सेवा सुविधांचे कामास सुरुवात केली असून संबंधित विभाग प्रमुख यांना प्राधान्याने कामे हाती घेऊन वेळेत पूर्ण करण्याचे सूचनादेश दिले असल्याचे मुख्याधिकारी केंद्रे यांनी सांगितले.