आ. किरण सरनाईकांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर; भीषण अपघातात ६ ठार
– आ. सरनाईक यांनी अपघातात पुतण्या, पुतणी व नात गमावली; वाशिम, अकोल्यात हळहळ!
अमरावती (शालिनी घोडेस्वार) – अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या भावाच्या वाहनाचा अकोला जिल्ह्यातील पातूरमधील उड्डाण पुलाजवळील शिगर नाल्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जण ठार झाले. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये सरनाईक कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला. मेडशीमार्गे अकोल्याकडे जात असताना पातूरच्या घाटातील नवीन बायपासनजिक दोन वाहनांची समोरासमोर जबर धडक झाली. या घटनेत वाशिमचे शिक्षक आमदार किरणराव सरनाईक यांचा पुतण्या रघुवीर अरूणराव सरनाईक (२८), पुतणी शिवानी अजिंक्य आमले (३०) आणि नात अस्मिता अजिंक्य आमले (९ महिने) यांच्यासह सिद्धार्थ इंगळे (पास्टूल, पातूर), शंकर ठाकरे आणि सुमेध इंगळे हे सहा जण जागीच ठार झाले; तर अन्य चार जण गंभीर जखमी आहेत. अपघातामधील जखमींना अकोल्यात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
या अपघातात किरण सरनाईक यांचे बंधू अरुण सरनाईक यांचा मुलगा रघुवीर सरनाईक, शिवानी सरनाईक (आमले) यांच्यासह दुसर्या गाडीतील अकोल्यातील आसटूल गावातील दोघांचा मृत्यू झाला. तर मृतक शिवानी सरनाईक यांची मुलगी अस्मिता आमले आणि इतर काही जण गंभीर जखमी झाले. प्राप्त माहितीनुसार, रघुवीर याच्यासह कुटुंबातील अन्य मंडळी त्यांच्या एम.एच. ३७ व्ही ०५११ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने अकोल्याकडे चालले होते. यादरम्यान पातूरच्या घाटातील नवीन बायपासनजिकच्या नानासाहेब मंदिराजवळ विरूद्ध दिशेने भरधाव आलेले चारचाकी वाहन सरनाईक कुटुंबियाच्या वाहनास धडकले. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचा समोरचा भाग चक्काचूर होऊन रघूवीर, शिवानी, अस्मिरा यांच्यासह सिद्धार्थ इंगळे, सुमेध इंगळे आणि शंकर ठाकरे हे सहा जण जागीच ठार झाले; तर सपना देशमुख (४१) आणि वैभव देशमुख (११), पियूष देशमुख (११) आणि श्रेयस सिद्धार्थ इंगळे (३ महिने) हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या ह्रदयद्रावक घटनेची वार्ता वाशिममध्ये कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. शिक्षक आमदार किरणराव सरनाईक आणि त्यांचे बंधू प्राचार्य अरूणराव सरनाईक यांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेतली. या अपघातानंतर तातडीने पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके आणि त्यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. अपघातानंतर रस्त्यावर एकच गर्दी झाली होती. पोलिसांनी अपघाती वाहन रस्त्याच्या बाजूला करत वाहतुकीचा मार्ग मोकळा केला. घटनेचा पुढील तपास पातूर पोलिस करित असल्याची माहिती मिळाली आहे.
—-