एकनाथ शिंदेंचा शिवसेनेवरच दावा!
– संसदेतील शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेण्यासाठी दावा दाखल
– शिंदे यांच्याकडे आता दोनतृतीयांश शिवसेना लोकप्रतिनिधींचे बळ; मूळ पक्ष जवळपास ताब्यात!
नवी दिल्ली (विशेष राजकीय प्रतिनिधी) – शिवसेनेचे बंडखोर नेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर निर्णायक चाल चालली आहे. शिंदे यांनी शिवसेनेवरच दावा ठोकत, लोकसभेच्या अध्यक्षांकडे १२ खासदारांना घेऊन जात, आपले शक्तिप्रर्दशन केले. तसेच, १९ पैकी १८ खासदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याने, आपणच शिवसेनेचे नेते आहोत, असे स्पष्ट केले. शिंदे गटाने नियुक्त केलेला संसदीय मंडळाचा पक्षनेता व पक्षप्रतोद यांना मान्यता देण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात कार्यालयाचा ताबा देण्याचीही मागणी खासदारांनी केली आहे. आमच्याकडे दोन तृतियांशपेक्षा अधिक बहुमत असल्याचे सांगत, गटनेते पदावरही शिंदे गटाने दावा केला. आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला याबाबत काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. अध्यक्षांच्या मंजुरीनंतर शिंदे गट निवडणूक आयोगाकडेही जाणार असून, त्यानंतर पक्षाच्या चिन्हावर दावा दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले.
लोकसभा अध्यक्षांच्या भेटीनंतर १२ खासदारांसह मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, की ‘सर्व १२ खासदारांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्र दिले. शिवसेना लोकसभा गट तयार करुन १२ लोकांचे पत्र दिलेले आहे. दिल्लीत येण्याचे हे एक कारण होते. तर दुसरे कारण म्हणजे ओबीसी आरक्षणासाठी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. त्याच सुनावणीच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ वकिलांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत आलो होतो. हे दोन विषय महत्त्वाचे असल्यामुळे मी दिल्लीत आलो होतो. मी सर्व बारा खासदारांचे मनापासून स्वागत करतो’, असे एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले.
दरम्यान, काल रात्रीच दिल्लीत पोहोचलेले एकनाथ शिंदे यांनी आज दिवसभर राजधानी नवी दिल्लीत भेटीगाठी घेतल्या. उद्याच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीप्रकरणी त्यांनी वकिलांशी चर्चा केली. त्यानंतर शिवसेनेच्या १२ खासदारांशी चर्चा करून त्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला गेले. तेथे त्यांनी शाह यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या भेटीनंतर ते खासदारांना घेऊन थेट लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे गेले. यावेळी खासदारांनी अध्यक्षांकडे स्वतंत्र गट म्हणून मान्यता देणे व राहुल शेवाळे यांना पक्षप्रतोद म्हणून मान्यता देण्याबाबतचे पत्र सोपावले. खासदारांच्या या गटाला घेऊन शिंदे हे निवडणूक आयोगाकडेही जाणार होते. परंतु, अध्यक्षांच्या भूमिकेनंतर त्याबाबत पाऊल उचलण्याचे त्यांनी ठरवलेले आहे. शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदार मूळ पक्ष शिवसेनेपासून दूर झालेले आहेत. या शिवसेनेचे नेते म्हणून शिंदे यांची कालच निवड झालेली असून, त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीही जाहीर केलेली आहे. त्यामुळे खासदार व आमदारांच्या संख्या बळाच्या आधारावर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे दोनतृतीयांश लोकप्रतिनिधी असल्याचा दावा करत, मूळ शिवसेना त्यांची असल्याचा दावा चालवला आहे. आता लोकसभेचे अध्यक्ष काय निर्णय घेतात, यावर शिंदे यांचे राजकीय गणित अवलंबून आहे. १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे शिवसेना गट तयार करून पत्र दिले आहे. तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल शेवाळे यांच्या गटनेतेपदाला मान्यता दिल्याचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष
एकीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा सांगितला असतानाच दुसरीकडे, महाराष्ट्रीय राजकीय संकटावर उद्या (दि.२०) सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षेखालील न्यायपीठ उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी घेणार आहे. या न्यायपीठात सरन्यायाधीशांसह न्यायमूर्ती कृष्ण मुरारी व हेमा कोहली यांचा समावेश आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा : एकनाथ शिंदे
पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, २०१९ साली शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली होती. जे अडीच वर्षापूर्वी झाले पाहिजे ते आम्ही आज केले आहे. १२ खासदारांनी घेतलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. जनतेच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केले आहे. राज्याच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा आहे. केंद्र आणि राज्य जेव्हा एकत्र मिळून काम करते तेव्हा प्रगती होते. लोकाभिमुख निर्णय घेण्यात सुरुवात केली आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात उद्या सुनावणी आहे, त्यासंदर्भातील आढावा घेण्यासाठी दिल्लीत आल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.
शिवसेनेचे संसदेतील कार्यालय ताब्यात घेणार
शिवसेनेच्या १२ खासदारांच्या समर्थनानंतर संसदेतील शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेण्याच्या हालचाली एकनाथ शिंदे यांनी सुरु केल्या आहेत. शिंदे गटाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र लिहिले असून, यामध्ये आमच्याकडे दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमत असल्याचे सांगत शिंदे गटाने संसदेतील सेना कार्यालयावर दावा सांगितलेला आहे.
————