साखरखेर्डा (अशोक इंगळे) – सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा मतदारसंघ म्हणून ओळख आहे. नेहमीप्रमाणे होणारे मतदान यावेळी परिवर्तनाचे वारे जोमाने वाहात अवकाळी पावसाने नेमकी दिशा कशी बदलली याची आकडेमोड पारावर बसून आणि सोशल मीडियावर टाकून चर्चेला रंगत आणली आहे. गावोगावीची तरूणाई सद्या याच आकडेमोडीत रमली असून, कुण चालला आणि कोण मागे पडला, यावर गप्पांचा फड जोरदार रंगताना दिसत आहे.
चिखली तालुक्यातील मंगरुळ, शेलगाव आटोळपासून या मतदारसंघाची सुरुवात होते. चिखली, लोणार तालुक्यातील काही गावे आणि सिंदखेडराजा व देऊळगाव राजा तालुका मिळून या मतदारसंघाची रचना झाली आहे. निमखेड हे सर्वात शेवटचे गाव. साखरखेर्डा, मलकापूर पांग्रा, शेंदुर्जन, बिबी, किनगाव जट्टू , दुसरबीड, किनगाव राजा, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, देऊळगावमही ही गावे पाच हजार ते २० हजार मतदार असलेली गावे आहेत. तरीही संपूर्ण ग्रामीण भागात वसलेला मतदारसंघ म्हणून ओळख असलेला हा मतदारसंघ आहे. या मोठ्या दहा ते बारा गावात ९० हजार मतदार असून, सर्वाधिक देऊळगावराजा त्यानंतर सिंदखेडराजा आणि साखरखेर्डा गावाचा समावेश आहे. बाकी २ लाख ३५ हजार ६७ हे ग्रामीण भागातील मतदार आहेत. या ग्रामीण भागातील मतदारांचा उत्साह यावेळी वेगळ्याच वळणावर दिसून आल्याने राजकीय पक्षनेते यांना तुम्ही यावेळी थांबा आम्हाला आमचा हक्क बजाऊ द्या साहेब.. असा निर्वाणीचा इशारा देत ग्रामीण भागातील मतदारांची टक्केवारी ही सत्तरी पार करून गेली. मतदान करताना कोणाच्या विरोधात नाही तर सकारात्मक लाट उसळली होती. त्यामुळे नेमकं मतदारांच्या मनात काय चाललं याचा अंदाज आलाच होता. आज पक्षीय कार्यकर्ते झालेल्या मतदानाची टक्केवारी काढून आकडेमोड करून आपलाच उमेदवार कसा निवडून येतो याचे गणित काढत आहे. खरंतर आकडेमोड करताना २१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत याचा विसरच त्यांना पडला आहे. जाधव, खेडेकर, तुपकर यांची वाटणी केली की मोकळे. मगर, शेळके यांच्यासह सर्वांनाच मते मिळाली आहेत. हे नाकारून चालणार नाही. शहरी विरुद्ध ग्रामीण असा सामना रंगला तर ग्रामीण भागात झालेले मतदार वादळीवार्यासह अवकाळी पावसासारखे होते. नेमकं यावेळी तेच झालं. जशी निवडणूक लागली तसा अवकाळी पाऊसही बरसत राहिला. वारेही जोरात वाहात होते. त्या वेगातचं परिवर्तनाचे वारेही बघायला मिळाले. ४ जूनपर्यंत हा आकड्यांचा खेळ आणि सट्टाबाजार निवडणूकपूर्वी आणि निवडणुकीनंतर सर्वकाही सांगून जातो.