सभा ‘ताईं’ची, चर्चा तुपकरांच्या विजयाची!
– सिंदखेडराजा, देऊळगावराजा, लोणार तालुक्यांत रविकांत तुपकरांची जोरदार लाट!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांची काल दुसरबीड येथे जाहीर सभा पार पडली. या सभेला सिंदखेडराजा, लोणार, देऊळगावराजा या तालुक्यातील वंजारी समाज बांधवांसह सर्व जातीधर्माच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सभेत, नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना विजयी करण्याचे आवाहन पंकजाताईंनी केले. परंतु, ही सभा संपल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधला असता, वंजारी समाजातील बहुतांश नागरिकांनी ‘ताई येणार म्हणून आम्ही सभेला आलो. ताईंची सभा पडली नाही पाहिजेत, म्हणून समाजाने गर्दी केली. परंतु, गेल्या १५ वर्षातील अनुभव पाहाता, यंदा शेतकरी, गरिबांसाठी लढणार्या रविकांत तुपकर यांनाच साथ देण्याचा आमचा निर्णय झाला आहे’, असे बहुतांश नागरिकांनी सांगितले. त्यामुळे सभा ताईंची, गर्दीही ताईंचीच, परंतु लोकांत चर्चा मात्र तुपकरांची, असे चित्र सभास्थळी दिसून आले.
दुसरबीड येथे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ भाजप नेत्या पंकजा मुंडे-पालवे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेला उमेदवार प्रतापराव जाधव, आ.डॉ.राजेंद्र शिंगणे, आ.श्वेताताई महाले, माजी खा. सुखदेव काळे, माजी आ.तोताराम कायंदे, माजी आ.शशिकांत खेडेकर, माजी आ.विजयराज शिंदे, माधवी कानेकर, संजय कानेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांन्टे, सचिन देशमुख, राजेश रंगळे, इरफान अली शेख, डॉ.सुनिल कायंदे, आशाताई झोरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
पंकजा मुंडे-पालवे म्हणाल्या, की कोणाचे वाईट व्हावे असे वाटत नाही, सर्वांना शक्ती देणे हे माझे काम आहे, म्हणून मी याठिकाणी बीडमध्ये स्वतः उमेदवार असतानासुद्धा प्रचारासाठी आले आहे. देशाला जगातील सर्वात मोठे आर्थिक महाशक्ती बनवायचे असेल तर नरेंद्र मोदीशिवाय पर्याय नाही. मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन पंकजा मुंडे-पालवे यांनी केले. सभेचे सूत्रसंचलन भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे यांनी केले. या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असली तरी, ही गर्दी फक्त पंकजा ताईंच्या प्रेमापोटी झाल्याचे प्राकर्षाने दिसून आले. मतदान कुणाला करायचे ते करू, पण ताई आपल्या आहेत, आणि त्यांची सभा पडली नाही पाहिजेत, या भूमिकेतून मोठ्या प्रमाणात तीनही तालुक्यांतून समाज बांधवांनी या सभेला गर्दी केली होती. सभा ताईंची असली तरी मात्र सभास्थळी चर्चा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचीच होती. सभास्थळी आलेल्या एक नागरिक मल्हारी नागरे यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, आमच्या भागात रविकांत तुपकर हेच चालणार आहेत. त्यामुळे ताईंच्या सभेला आलो असलो तरी आमचा निर्णय झालेला आहे. दुसरे एक नागरिक वैâलास जायभाये यांनी सांगितले, की ताई येणार म्हणून दुसरबीडला आलो आहोत. शेवटी ताईंची सभा मोठीच दिसली पाहिजेत. परंतु, गेल्या १५ वर्षातील अनुभव वाईट आहेत. म्हणून, सर्व शेतकरी यावेळेस रविकांत तुपकर यांनाच मतदान करणार आहे. एकूणच सभेला उपस्थित सर्वच नागरिकांच्या चर्चेतून तुपकर यांनाच मतदान करण्याचा निर्धार दिसून येत होता.
—-