– दक्षणा फाउंडेशन या संस्थेत NEET व JEE कोर्स प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना विषबाधा
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : खेड तालुक्यातील कडूस परिसरातील दक्षणा फाउंडेशन या संस्थेत NEET व JEE कोर्स साठी शिक्षण घेत असलेल्या १७० विद्यार्थ्यांना उलटी व जुलाबाचा त्रास झाला. जेवणातुन विषबाधा झाल्याने उपचारास दाखल करण्यात आले आहे. यातील १११ विद्यार्थी यांना किरकोळ आजारी असल्याने उपचारा नंतर सोडण्यात आले. यात ५७ मुलांवर चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून २ मुलांना पुढील उपचारासाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी परिस्थिती नियंत्रणात असून आरोग्य सेवेने तात्काळ दखल घेत उपचार केल्याची माहिती खेड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी दिली.
खेड तालुक्यातील कडूस परिसरात दक्षणा फाउंडेशन या संस्थेत NEET व JEE कोर्स साठी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना उलटी व जुलाबाचा त्रास झाला. या बाबतची माहिती मिळताच प्राथमिक आरोग्य केंद्र कडुस येथील वैद्यकिय अधिकारी व त्यांचे पथक यांनी घटनास्थळी जाऊन उपचार सुरु केले. त्यातील ५९ विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय चांडोली येथे उपचारासाठी दाखल करीत त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यातील २ विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी वायसीएम हॉस्पिटल पिंपरी येथे संदर्भित करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे संतोष पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी ग्रामीण रुग्णालय चांडोली व दक्षणा फाउंडेशन कडूस येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. औषधोपचारासह आरोग्याची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन केले. या भेटीच्या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद पुणे, गटविकास अधिकारी पंचायत समिती खेड व तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती खेड यांचेसह आरोग्य पथकातील मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थी यांस उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाल्याने उपचारास दाखल केले आहे. या संदर्भात नमुने घेवून तपासनीला देण्यात आले आहे. नेमका कशामुळे त्रास झाला हे नमुना तपासणी अहवाल आल्यावर समजेल असे खेड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी सांगितले. ग्रामीण रूग्णालय चांडोली आणि वायसीएम रुग्णालय पिंपरी येथे दाखल केलेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असून सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले.