बुलढाणा (संजय निकाळजे) – जिल्ह्यात दोन विवाहित महिला बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या महिला कुठे निघून गेल्यात, की त्यांचे अपहरण झाले, अशा नानाविध शंका उपस्थित होत आहेत. तसेच, निवडणुकीच्या तोंडावर या घटना घडल्याने महिलावर्गात भीतीचे वातावरण असून, महिलांना पळवणारी टोळी तर सक्रीय झाली नाही ना, अशाही शंका-कुशंका ग्रामीण भागात वर्तविल्या जात आहेत. हिवरा आश्रम (ता.मेहकर) येथून २३ वर्षीय विवाहिता लहान बाळासह बेपत्ता झालेली आहे. याबाबत साखरखेर्डा पोलिसांत तक्रार दाखल झालेली आहे. तर दुसर्या घटनेत, पुणे येथील शिवाजीनगर बसस्थानकावरून तीन दिवसापासून निघालेली पत्नी आपल्या मूळ गावी अंढेरा येथे अद्यापही पोहोचली नाही. त्यामुळे पतीने पत्नी हरवल्याची तक्रार शिरूर पोलीस स्टेशनला दिली आहे.
सविस्तर असे, की हिवरा आश्रम येथील कोमल सर्वेश द्विवेदी (वय २३) ही विवाहिता आपल्या लहान बाळासाह १८ एप्रिलपासून गायब आहे. तिचे सेवानिवृत्त शिक्षक सासरे अनिलकुमार द्विवेदी (वय ६०) यांनी व या विवाहितेचा पती सर्वेश द्विवेदी यांनी प्रचंड शोधाशोध केली, पण तिचा शोध लागू शकला नाही. याबाबत साखरखेर्डा पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी मिसिंग नोंदवून घेतली आहे. सदर महिला कुणाला दिसल्यास 9422748590, 8788728737 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केलेले आहे. दुसर्या एका घटनेत, अंढेरा ता.देऊळगावराजा, जि.बुलढाणा येथील सुभाष गोविंदा विणकर (वय ५५) हे शिवाजी विद्यालय हिरलोक ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथे शिक्षक म्हणून नोकरीस असून, कुडाळ येथे राहतात. पुतण्याचे १९ एप्रिल रोजी लग्न असल्याने सुभाष विणकर हे १३ एप्रिल रोजी मूळ गावी अंढेरा येथे आले, व त्यांची पत्नी सविता सुभाष विनकर ही मुलगी प्रिया हिचा पेपर असल्याने कुडाळ येथेच घरी होती. १६ एप्रिल रोजी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास कुडाळ ते पुणे या बसने या विवाहिता पुणे येथे आल्या व १७ एप्रिल रोजी पुणे येथून सकाळी ९ वाजताचे दरम्यान मूळ गावी अंढेरा येथे येण्यासाठी शिवाजीनगर ते अकोला बसमध्ये बसल्या. त्यानंतर पती सुभाष विणकर यांनी त्यांच्या पत्नीस ११.५० वाजताचे सुमारास फोन करून चौकशी केली असता, पत्नीने सांगितले की, बस शिरूर बस स्टॅन्डला आहे व ती नादुरुस्त झाली आहे. माझा फोनदेखील चार्जिंग नाही. त्यामुळे सुभाष विनकर यांनी नंतर फोन केला नाही व सदर बस अंदाजे सायंकाळी ७ वाजेपर्यंत देऊळगावमही बस स्टॉपला येणे अपेक्षित होते, मात्र ते रात्री दहा वाजेपर्यंत थांबले तरी बस आली नाही व पत्नीचा फोनदेखील बंद होता. ही सर्व घटना शिरूर बसस्थानकापासून जालना प्रवासादरम्यान घडली आहे. त्यानंतर त्यांनी नातेवाईक यांच्याकडे पत्नी सविता हिचे बाबत चौकशी केली असता कोठेही मिळून आली नाही. त्यामुळे त्यांनी शिरूर पोलीस स्टेशनला पत्नी हरवल्याची तक्रार दिली आहे. त्यामध्ये त्यांनी वरील सर्व माहिती सांगून पत्नी सविता सुभाष विणकर (वय ४३) हिचे केस काळे आखूड, उंची ५ फूट ३ इंच, रंग सावळा, अंगाने जाड, चेहरा गोल, अंगात काळे रंगाचे टॉप व पांढर्या रंगाचा पायजमा, ओढणी असे वर्णन आहे. सदर वर्णनाची महिला कुणाला कोठेही आढळल्यास ८९७५५५६६४०, ८२७५६६३७९८, ७७०९०७२१७९ या नंबरवर व शिरूर पोलीस स्टेशनची संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या दोन घटनांनी जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे.
—————