BuldanaBULDHANAHead linesLONARPolitical NewsPoliticsSINDKHEDRAJAVidharbha

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात रविकांत तुपकरांची त्सुनामी लाट!

– कार्यकर्ते म्हणतात, ‘भाऊ, साहेब, आमदार साहेब आम्हाला थोडी मोकळीक द्या’; तुपकरांसाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते पेटले!

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – साखरखेर्डा आणि शेंदुर्जन, बिबी, सोनुशी वर्दडी या जिल्हा परिषद सर्कलमधील शेतकर्‍यांनी रविकांत तुपकर यांच्या प्रचार रॅलीत सहभागी होऊन तुपकर यांना विजयी करण्याचा संकल्प केला आहे. शेतकर्‍यांची आणि युवकांची लक्षणीय उपस्थिती पाहून स्वत: तुपकर यांना गहिवरून आले. तर, या विधानसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या तुपकरांच्या त्सुनामी लाटेत सर्वपक्षीय कार्यकर्ते, व काही पदाधिकारी पक्षीय अभिनिवेष बाजूला सारून सहभागी झाले असून, ‘भाऊ, साहेब, आमदार साहेब आम्हाला पिंजर्‍यातून मुक्त संचार करु द्या!, लोकसभेसाठी थोडी मोकळीक द्या’, अशी विनंती करुन कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असल्याने ही त्सुनामी तुपकरांना मोठा लीड देणार असल्याचे जवळपास स्पष्टच झालेले आहे. साखरखेर्डा, बिबी येथे प्रचंड रॅली निघाली होती. या दोन्ही ठिकाणच्या सभांना मिळालेला उत्साही प्रतिसाद परिवर्तनाचे संकेत देणारा होता. वर्दडी येथील सभेला तरुणांसह वयोवृद्ध नागरिकांनीसुद्धा रविकांत तुपकर यांना विजयाचा विश्वास दिला.

सोयाबीन, कपाशीच्या भाववाढीचा प्रश्न असो, की नुकसान भरपाईचा प्रश्न असो, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सतत लढा दिला आहे. घरावर तुळशीपत्र ठेवून शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी जेलभरो आंदोलन असो की, रास्तारोको आंदोलन असो, हा धाडसी युवक कधीही डगमगला नाही. आज लोकसभा निवडणूक रिंगणात उतरुन शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी लढणार्‍या या युवा नेत्याला लोकसभेत पाठविण्याचा निर्धार शेतकर्‍यांनी केला आहे. परवा, १८ एप्रिलरोजी साखरखेर्डा नगरीतून प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी हजारो शेतकरी युवक सहभागी झाले होते. साखरखेर्ड्यात पहिल्यांदाच एखाद्या अपक्ष नेत्याचे असे वादळ दिसून आले. एकीकडे विरोधात मोठे नेते असताना रविकांत तुपकर एकाएकी लढत देत आहेत. महाभारतातील कौरव आणि पांडव यांच्यातील सत्तासंघर्षात पांडवांचा विजय झाला होता. कौरवाकडे सर्वकाही असतांना पराभव झाला होता. आज बुलढाणा जिल्ह्यातही राजकारणातील महाभारत पहावयास मिळत आहे. खालच्या पातळीवर जाऊन सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहे. आरोप प्रत्यारोप होत आहेत. पण शेतकरीराजा या निवडणुकीच्या फडात राजकीय पक्षांना मूठमाती देऊन आपला स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी तुपकरांसारख्या शेतकरी नेत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे, असे काही चित्र आज दिसून येत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ.राजेंद्र शिंगणे हे उमेदवार असतांना त्यावेळी बुलंद तोफ म्हणून रविकांत तुपकर यांची मुलुख मैदानी तोफ शिंगणे यांच्यासाठी धडधडली होती. तर प्रतापराव जाधव यांच्या बाजूने संजय गायकवाड किल्ला लढवित होते. आज २०२४ च्या निवडणुकीत चित्र बदलले आहे. आज सर्व जिल्ह्यांतील आमदार, खासदार प्रतापराव जाधव यांच्या बाजूने असताना मतदार मात्र रविकांत तुपकर यांच्यासोबत सक्षमपणे उभे ठाकलेले आहेत. पक्षाच्या उमेदवारांना पक्षाकडून रसद मिळत असते, पण अपक्ष उमेदवाराला रसद गोळा करावी लागते. चटणी-भाकर खाऊ आणि रविकांत तुपकर यांना निवडून आणू, असा नारा देत शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेला भरभरुन मत देणार्‍या मतदारसंघात रविकांत तुपकर यांच्या ‘पाना’ निशाणीचे जोरदार वादळ आलेले आहे. या मतदारसंघात लोकसभेला घड्याळ नसल्याने सिंदखेडराजा मतदारसंघात चिंताच राहिली नाही. कमळही नाही, त्यामुळे मतदारही स्वतंत्र गप्पा मारायला लागला आहे. ना झेंडा ना दांडा, हातात घेऊन पाना, अशा भूमिकेत मतदार उतरला आहे. शिंदे गटाची भिस्त भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर आहे. या पक्षाचे नेते प्रतापराव जाधव यांच्या सोबत असल्याचे दिसून येत आहे, कार्यकर्ते मात्र दूरच उभे राहून गंमत पाहात आहेत. साहेब, आमदार साहेब, भाऊ आम्ही तुमचेच! यावेळी तुम्ही उभे नाही. यावेळी आम्हाला पिंजर्‍यातून मुक्त संचार करु द्या! कारण ज्यांनी रक्ताचे पाणी आणि हाडाचे काडं करुन आमच्यासाठी लढला त्यासाठी एक दिवस द्या, अशी विनंती करुन शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे सिंदखेडराजा मतदार संघात इतिहासाची पुनरावृत्ती होण्याचे संकेत मिळत आहेत. तुपकरांची सिंदखेडराजा-देऊळगावराजा मतदारसंघात जोरदार त्सुनामी लाट उसळली असून, ही लाट परिवर्तनाचे संकेत आहे.


कोणत्याही अफवा आणि अमिषाला बळी पडू नका : रविकांत तुपकर

शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, तरुण, महिला तसेच ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने मी लोकसभा निवडणूक लढत आहे. मी कोणत्या जाती-धर्माचा, पक्षाचा उमेदवार नाही तर मी जनसामान्यांचा उमेदवार आहे. जनतेचा मला मिळत असलेला पाठिंबा पाहून विरोधक आता चांगलेच हादरले आहेत. त्यामुळे विरोधक चुकीच्या अफवा पसरवित आहेत तर काहींना वेगवेगळे अमिषदेखील दाखवित आहेत. पुढील सात दिवस आता कोणत्याही अफवांना आणि अमिषाला बळी पडू नका, असे आवाहन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले. मेहकर शहरात झालेल्या रेकॉर्डब्रेक रॅली व विक्रमी सभेनंतर साखरखेर्डा, बिबी, वर्दडी या गावांमध्येदेखील जंगी सभा झाल्या तर ठिकठिकाणी मतदारांनी तुपकरांचे जोरदार स्वागत केले.
मी नावापुरता भूमिपुत्र नाही, चार एकराचा सातबारा असलेला आणि शेती व मातीत रुळलेला खराखुरा भूमिपुत्र आहे. एकीकडे आमदार, मंत्र्यांची फौज आहे तर दुसरीकडे सर्वसामान्य कुटुंबातील शेतकर्‍याचा मुलगा आहे. ‘जनशक्ती विरुद्ध धनशक्ती’ अशी थेट लढत होत आहे. ग्रामीण व शहरी अशा सर्वच भागातून आणि समाजातील सर्वच घटकातून मिळत असलेला जोरदार पाठिंबा आणि समर्थन पाहता विरोधकांचे धाबे दणाणले आहे. जेव्हा एखाद्याला मैदानात हरविता येत नाही तेव्हा त्या योद्ध्याच्या विरोधात चुकीच्या अफवा पसरविण्याचे काम केले जाते आणि हाच प्रकार आपल्या सोबत घडविला जात आहे. परंतु आता जनतेला सर्व कळून चुकले आहे. यांनी कितीही खोटे आरोप केले, कितीही अफवा पसरविल्या तरी काहीच फरक पडणार नाही. सर्वसामान्य जनतेने आता पक्का निर्धार केला आहे. आपल्या हक्काचा माणूस संसदेत पाठवायचा, या निर्णयावर सर्वस्तरीय नागरिकांचे शिक्कामोर्तब झाले आहे. गावोगावी मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि आशीर्वाद विजयाचे संकेत देणारे आहेत. सामान्य जनतेच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची परतफेड करण्यासाठी मी जिवाचे रान करेल, तुमच्यावर पश्चातापाची वेळ कधीच येऊ देणार नाही, अशी ग्वाही देत रविकांत तुपकर यांनी गेल्या २२ वर्षात केलेल्या कामाची मजुरी म्हणून एक मत द्या, असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!