तुपकरांचेही महामानवाला अभिवादन, बुलढाण्यातील मिरवणुकीत धरला ठेका!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती १४ एप्रिलरोजी जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. रॅली मिरवणुकांसह विविध कार्यक्रमानी जिल्हा दणाणून सोडला होता. बुलढाणा शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये आंबेडकरी अनुयायांसह विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी चांगलाच ठेका धरला होता.
खामगाव येथे नगरपालिका मैदानाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अभिवादन सभेचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष दादाराव हेलोडे, जिल्हा सरचिटणीस बी. के. हराळे, भारिप-बमसंनेते अशोक सोनोने, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, संघपाल जाधव, जिल्हाध्यक्ष देवा हिवराळे यांच्यासह आंबेडकरी अनुयायी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शहरातून भव्य मिरवणूक करण्यात आली. यामध्ये शेतकरी नेते रविकांत यांनीही सहभाग नोंदविला. नांदुरा येथे मोटारसायकल रॅली काढण्यात आली. मेहकर येथे स्थानिक वाटिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खा. प्रतापराव जाधव, आ. संजय रायमुलकर, शेतकरी नेते रविकांत तुपकर, भाई कैलास सुगंधाने, शैलेश गावस्कर, जितू अडेलकरसह मान्यवरांनी अभिवादन केले. मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथे बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये सर्व जातीचे लोक आवर्जून सहभागी झाले होते. येथील ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, सिद्धार्थ बुद्ध विहारसह विविध ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच संदीप अल्हाट यांनी मसालेदार खिचडीचे वाटप केले. जिल्ह्यातील चिखली, जळगावराजा, सिंदखेडराजासह इतर ठिकाणी विविध कार्यक्रमातून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. चिखली तालुक्यातील अंत्री कोळी येथेही बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. सर्व जातीधर्माचे लोकं या मिरवणुकीत सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातही बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन यांच्यासह त्यांचे अधिकारी, व कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातसुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.