जीवघेणे ओव्हरटेक भोवले; स्कॉर्पिओ उलटून चार ठार!
अंबाशी गावावर शोककळा; नवरीला हळद लावण्यासाठी निघाले, मृत्यूने वाटेतच गाठले!
देऊळगावराजा (अनिल दराडे) – चिखली-जालना महामार्गावरील देऊळगावराजानजीक असलेल्या दगडवाडी फाट्याजवळ दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात स्कॉर्पिओच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भरधाव स्कॉर्पिओ डिव्हायडरला धडकून पलटी झाली. या भीषण अपघातात चिखली तालुक्यातील अंबाशी येथील देशमुख कुटुंबातील तिघे व एक पाहुणा असे चौघेजण ठार झाले असून, इतर चौघे गंभीर जखमी झालेले आहेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. आज, १७ एप्रिलरोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. जालना येथील नवरीला हळद लावण्यासाठी देशमुख कुटुंबीय जालन्याकडे निघाले होते. परंतु, वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने लग्न समारंभावर दुःखाचे सावट पसरले होते. तसेच, अंबाशी गावात एकच शोककळा पसरून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती.
या अपघातातील मृतांपैकी तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता, तर गंभीर जखमी अवस्थेतील चालक योगेश लक्ष्मण देशमुख यांच्या छातीला जबर मार लागल्याने अतिरक्तस्त्रावाने त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यास जालना येथे तत्काळ उपचारासाठी हलविण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यानेही दम तोडला. या दुर्देवी अपघातात, चालक योगेश लक्ष्मणराव देशमुख (५०, रा. अंबाशी, ता. चिखली), वसंतराव देविदास देशमुख (४५, रा. अमानी, जि. वाशिम), अशोकराव भीमराव नाईक (६५, रा. सवणा, जि. वाशिम) आणि विलास जयवंतराव देशमुख (७६, रा. अंबाशी, ता. चिखली) हे चौघेजण ठार झाले आहेत. दरम्यान, जखमीमध्ये गोपाळराव आबाराव देशमुख (वय ४३), मीराबाई संजय देशमुख (वय ४०), शालीनीबाई अनंत देशमुख (वय ३४), अक्षरा संदीप देशमुख (वय १४) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर जालना येथे वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
हे सर्व कुटुंबीय अंबाशी (ता.चिखली) येथून एमएच-२८-बीक्यू-०६०६ क्रमांकाच्या स्कॉर्पिअो गाडीने जालना येथे नातेवाईकाच्या हळद समारंभासाठी व उद्याच्या लग्न सोहळ्यासाठी जात होते. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांचे वाहन दगडवाडी फाट्यानजीक आले असता, एका दुचाकीला अोव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालक योगेश लक्ष्मणराव देशमुख याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर गाडी डिव्हायडरला धडकून उलटली. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस व स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघातामधील गंभीर जखमींवर डॉ. प्रिती दिवाकर व अक्षय गुट्टे यांनी तत्काळ उपचार सुरू केले. परंतु, चौघांना वाचविण्यात त्यांना अपयश आले. उर्वरित चौघांवर वैद्यकीय उपचार सुरू असून, एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
अंबाशी (ता.चिखली) येथील देशमुख कुटुंबात उद्या, दि. १८ एप्रिलरोजी लग्न होते. सदर लग्नाच्या अनुषंगाने नवरीला हळद लावण्यासाठी दोन वाहने जालना येथे जाण्यासाठी निघाली होती. अपघातग्रस्त वाहनात एकूण ११ जण होते तर मागील वाहनात नवरदेवासह देशमुख कुटुंबातील व्यक्ती होते. मृतकात दोन जण पाहुणे असून, ते मूळचे अंबाशी येथीलच रहिवासी होते, असेही सांगण्यात आले आहे.
———