बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – भरधाव वाहनाने जोराची धडक देऊन दुचाकीला उडविल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार मामा जागीच ठार तर भाचा गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्देवी घटना काल (दि.१६) रात्री नऊ वाजेदरम्यान मेहकर ते खामगाव रोडवरील देऊळगाव साकरशानजीक पिंप्री धनगर फाट्यासमोर घडली. यातील भाच्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.
लोणार तालुक्यातील दाभा येथील संतोष रतन मोरे (वय ४०) व डिगांबर बाजड (वय २३) हे मामा-भाचे रामनवमीनिमित्त शेगाव येथे दर्शनासाठी दुचाकी क्रमांक २८ एएल २६१५ ने जात होते. दरम्यान, देऊळगाव साकरशाजवळील पिंपी धनगर फाट्यासमोर जानेफळ पोलीस स्टेशनची हद्द दर्शविणार्या फलकाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने ठोकारले. या अपघातात दुचाकीस्वार मामा संतोष रतन मोरे हे जागीच ठार झाले तर भाचा डिगांबर बाजड हा गंभीर जखमी झाला होता. त्याला खामगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, देऊळगाव साकरशा येथील पोलीस पाटील गजानन पाचपोर यांनी या अपघाताची जानेफळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार आजिनाथ मोरे यांना कळवली. ठाणेदारांनी पोकॉ विजय कंकाळ यांना तातडीने घटनास्थळी पाठविले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मदत व बचाव कार्य करून जखमीला दवाखान्यात हलविले. अधिक तपास जानेफळ पोलिस करत आहेत.
दरम्यान, दुसर्या घटनेत याच रोडवरील गुप्तेश्वर फाट्याजवळ काल रात्री ९ वाजेदरम्यान खामगावकडे जाणारी क्रूझर गाडी उलटून पाच ते सहा जण जखमी झाले होते. ते सर्व जण जिंतूर तालुक्यातील असल्याचे समजते. जखमींना तातडीने दवाखान्यात पाठविण्यासाठी देऊळगाव साकरशा येथील विश्वास सरदार, मनोहर वानखडेसह इतरांनी मदत केली. हे जखमीदेखील रामनवमीनिमित्त शेगावला जात होते, अशी माहिती मिळाली आहे.
—————