‘पांढरे सोने’ ७५०० तर ‘पिवळे सोने’ ७५ हजारांवर!
– लग्नसराईत लेकीसुनांना सोने कसे घ्यावे? आधीच हतबल बळीराजाचा सवाल!
देऊळगावराजा (राजेंद्र डोईफोडे) – जिल्ह्यात शेतकरी म्हणजे फक्त नावालाच बळीराजा उरले असले तरी ते निसर्गाच्या अवकृपेने व पिकांच्या घसरलेल्या भावामुळे सद्या कोमात गेला असून, सोन्याचे व्यापारी मात्र जोमात असल्याची चर्चा सुरू आहे. पांढर्या सोन्याचे (कापूस) भाव फक्त साडेसात हजार रुपये तर पिवळ्या सोन्याचे भाव ७५ हजाराचे वर म्हणजेच केंद्र सरकार शेतकर्यांचे की व्यापार्यांचे हा प्रश्न निर्माण होत आहे. शेतकरी, शेतमजुरांनी आपल्या भावी सुनेला सोन्याचे दागिने कसे व कोठून घ्यावे? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात व बुलढाणा जिल्ह्यात पांढरे सोने समजले जाणारे पीक म्हणजे कापूस होय. परंतु ते नीच स्तरावर आले असून व्यापार्यांचे पिवळे सोने हे मात्र वरचढ होवून आज दि.१४ एप्रिल रोजी ७५ हजाराचे भाव आहे. कारण काय तर लग्नसराई असतांना लग्न, शुभविवाह प्रसंगी सोन्याच्या दागिन्यांना महत्त्व आहे. गेल्या ३० ते ४० वर्षांपूर्वी पांढरे सोने म्हणजे कापसाचा भाव प्रति क्विंटल हा फक्त २२० रुपये होता. तर सोने फक्त एक तोळा दहा ग्रॅमला २१० रुपयेला मिळत होते. परंतु दरवर्षी बदल होत असून कापूस व इतर पिकाचे भाव कमी होत आहेत. दरवर्षी दिवसेंदिवस पिवळ्या सोन्याचे भाव गगनाला भिडले असून, आता ७५ हजाराचेवर गेले म्हणजे दहापट वाढ झाली. पांढरे सोने समजले जाणारे कापूस भाव कसे कमी झाले? मुला मुलींचे लग्नात सोन्या- चांदीचे दागिन्याला महत्त्व आहे. कारण ते वेळ प्रसंगी विशेषतः पेरणीचे वेळी कधीही आर्थिक संकटात पडू शकतात. सतत सोन्याचे भाव गगनाला भिडले असल्याने गरीब शेतकरी व विशेषतः शेतमजूर हा आपल्या भावी सुनेला सोन्याचे दागिने कसे घेणार? त्यात सध्या विवाहयोग्य मुलींचे व त्यांच्या आई वडील, नातेवाईक यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आणि बिचारा शेतकरी, शेतमजूर, भूमीहीन, आर्थिकदृष्ट्या सोने खरेदी करू शकत नाही. त्यामुळे राज्य व केंद्र सरकार हे वाढती महागाई संदर्भात शेतकर्यांच्या हिताचे नसून फक्त आणि फक्त व्यापारी यांचेच हिताचे असल्याची चर्चा आम जनता व मतदारांमध्ये दिसून येत आहे.