Breaking newsBuldanaBULDHANAHead lines

जिल्ह्यात सोसाट्याच्या वार्‍यासह तुफान पाऊस, गारपीट!

– खा. प्रतापराव जाधव, अ‍ॅड. शर्वरीताई तुपकर यांनी केली नुकसानीची पाहणी, शेतकर्‍यांना दिला धीर!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्याला आज (दि.१२) अवकाळी पाऊस व काही ठिकाणी गारपिटीने पुन्हा एकदा तुफान झोडपून काढले. मोताळा, खामगाव, मेहकर तालुक्यांतील काही भागासह इतर भागातही सोसाट्याच्या वारा, विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस बरसला. यामुळे ज्वारी, मका ही पिके भुईसपाट झाली असून कांदा, आंबा, फळबागा व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागात वादळामुळे झाडे उन्मळून पडली असून, टीनपत्रेही उडून गेली आहेत. त्यामुळे काही भागातील वीज पुरवठादेखील खंडित झाला होता. लग्नमंडपांची दाणादाण झाली आहे. दरम्यान, मावळते खासदार प्रतापराव जाधव, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या पत्नी अ‍ॅड. शर्वरीताई तुपकर यांनी मोताळा तालुक्यातील नुकसानीची तातडीने बांधावर जाऊन पाहणी केली व शेतकर्‍यांना धीर दिला.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसत आहे. आज दुपारनंतरही जिल्ह्यात मोताळा तालुक्यातील वडगाव, अंत्रीसह इतर भागात वादळी वार्‍यासह तुफान गारपीट झाली. खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी, शिर्ला नेमाने, अटाळी व इतर भाग तसेच मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा, नायगाव देशमुख, पाथर्डी, पारखेड, मोहना, मांडवा, वडाळी, घाटनांद्रा, वरवंड इतर भागातही वादळी वार्‍यासह तुफान पाऊस झाला. काही ठिकाणी गाराही पडल्या. या पावसामुळे ज्वारी, कांदा, केळी, मकासह फळबागांचे मोठे नुकसान झाले असून, आंब्याखाली सडा पडला. वादळी पावसामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळली तर कुठे नाल्यांना पूर गेल्याची माहिती आहे. तसेच, काही ठिकाणी टीनपत्रेही उडाली आहेत. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चान्नी, सायवणीसह इतर भागातही वादळी पाऊस बरसल्याने मोठे नुकसान झाले असून, पातूर ते चान्नी मुख्य लाईनवरील महावितरणचे दहा ते बारा इन्सूलेटर फुटल्याने तीस ते चाळीस गावांचा वीजपुरवठा खंडित झालेला आहे. वीजवितरणचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याबाबत सस्ती ता. पातूर येथील वीजवितरणचे कनिष्ठ अभियंता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाईल बंद होता. विशेष म्हणजे, परवा १० एप्रिलरोजीसुध्दा याच कारणामुळे पातूर व मेहकर तालुक्यातील चाळीस गावातील वीजपुरवठा जवळजवळ वीस तास खंडित झाला होता. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे लग्नमंडपीची एकच धांदल उडाली असून, काही ठिकाणी लग्नमंडपसुध्दा उडाले आहेत.


दरम्यान, जिल्ह्याचे मावळते खासदार तथा शिंदे गटाचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार प्रतापराव जाधव, अपक्ष उमेदवार तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या पत्नी अ‍ॅड. शर्वरीताई तुपकर यांनी मोताळा तालुक्यातील वडगावसह नुकसान झालेल्या भागाची तातडीने बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी आमदार संजय गायकवाड, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. झालेल्या नुकसानीची शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!