बुलढाणा (प्रशांत खंडारे) – स्थानिक चिखली रस्त्यावरील जगदंबामाता तमाम बुलढाणावासीयांचे श्रद्धास्थान आहे. जगदंबा देवीचे मंदीर प्राचीन असले तरी, अलिकडच्या काळात मंदिराचा जीर्णोध्दार भाविकांनी केल्याने आधुनिक बांधकामातही मंदिर खुलून दिसते. येथे चैत्र यात्रा उत्सव मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षीही 26 एप्रिलला साजरा होणारा हा चैत्र यात्रा उत्सव लोकसभा निवडणुकीच्या मतदानामुळे 30 एप्रिल रोजी साजरा होणार आहे.
या ठिकाणी नवरात्रामध्ये भाविकांच्या गर्दीने मंदिराचा परिसर फुलून जातो. नवरात्रामध्ये पहाटे चार वाजेपासून रात्री उशीरापर्यंत या मार्गावर गर्दी दिसून येते. या दरम्यान नऊ दिवसाची यात्रा देखील या परिसरात भरते. सकाळ संध्याकाळी होणा-या आरतीला भाविकांची गर्दी असते. नवसाला पावणारी देवी म्हणून जगदंबा मातेची दूरपर्यंत ख्याती आहे. बुलढाणा शहराची ग्रामदेवता म्हणून जगदंबा देवीला पुजले जाते. आधी बुलडाण्याचे नाव भिलठाणा होते. येथे भिल्लांची वस्ती होती. भिल्लांची मूळ आदिवासी देवता म्हणून जगदंबादेवी पूजली जाते. बुलढाणा पंचक्रोशीत एक जागृत देवस्थान म्हणून या देवीचा महिमा आहे. तसेच नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या देवीचे नवस फेडणारे भाविक वर्षभर मंगळवारी व शुक्रवारी देवीच्या परिसरात येतात. कबुल केल्याप्रमाणे नवस फेडतात. चैत्र महिन्यात जगदंबा देवीची यात्रा भरते. या यात्रेच्या निमित्ताने भाविक मंदिरावर गुळ, तिळाच्या रेवड्या उधळतात. विशेष म्हणजे चैत्र महिन्यातील जगदंबा मातेच्या चैत्र यात्रा उत्सवा त मातेचा नवस फेडण्यासाठी भाविक बारा गाड्या ओढण्याची परंपरा अद्यापही जपून आहेत.
श्री जगदंबा मातेचा चैत्र यात्रा उत्सव या वर्षी लोकसभा निवडणुकीचे मतदान असल्याने 26 एप्रिल ऐवजी 30 एप्रिलला साजरा होणार आहे. 29 एप्रिल रोजी होमहवनाचा कार्यक्रम संध्याकाळी होईल. बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम 30 एप्रिलला दुपारी 1 ते 6 वाजेपर्यंत होणार आहे. या कार्यक्रमांची भाविकांनी नोंद घ्यावी.
– अशोक पिंपळे, श्री जगदंबा माता संस्थान चिखली रोड, बुलढाणा
आम्ही अतिक्रमणात नाही!
चिखली रोडवर असलेला श्री जगदंबा माता संस्थान परिसर अतिक्रमणात असल्याचे म्हटले जात आहे. या संस्थानावर पाण्याची टाकी, नळ नाही किंवा इतर सुविधाही उपलब्ध नाहीत. त्यामुळे राहणारे भाविक हे आम्ही अतिक्रमणात नसल्याचे म्हणतात. त्यांनी सोयी सुविधां उपलब्ध करून देण्याची मागणीदेखील केलेली आहे.