समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; १ ठार, चौघे गंभीर जखमी
बिबी, ता. लोणार (ऋषी दंदाले) – तालुक्यातील मांडवा येथे समृद्धी महामार्गावरील लेन नंबर ३१३ वर पाठीमागून येणार्या भरधाव ट्रकने पुढे जाणार्या आयशर ट्रकला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात आयशर ट्रकचालक जागीच ठार झाला असून, इतर चौघेजण गंभीर जखमी झालेले आहेत. हा अपघात आज (दि.११) सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास घडला. जखमींना बिबी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.
मृत्यूचा सापळा बनलेल्या समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. आज पहाटे ८.४५ वाजेच्या सुमारास मुंबईहून नागपूरकडे जात असताना आयशर ट्रक (क्रमांक एमएच ०४, ८७४०) ला पाठीमागून येणार्या अत्यंत भरधाव वेगातील ट्रक (क्रमांक एमएच ४८ सीक्यू ४८२८) ने जोरदार ठोकर दिली. हा अपघात इतका भीषण होता, की आयशर ट्रकचा चालक रंजीत गौतम (वय ४०, रा. सुलतानपूर, उत्तरप्रदेश) हा जागीच ठार झाला. तर संतोष छोटूलाल हरिजन (वय २५, रा. उरण, मुंबई), महेंद्र गौतम (रा. सुलतानपूर, यूपी), सोनू गौतम (रा. सुलतानपूर, यूपी) हे गंभीर जखमी झालेले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच बिबी पोलिस ठाण्याचे ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक राजेश सरदार, यशवंत जैवळ, अंभोरे यांच्यासह वाहतूक मार्ग पोलिसचे पोलिस उपनिरीक्षक उज्जैनकर, निवृत्ती सानप, विठ्ठल काळुसे, अमोल जाधव, उमेश नागरे, जयकुमार राठोड हे तातडीने घटनास्थळी पोहोचले व मदत आणि बचावकार्य केले. अपघातातील जखमींना तातडीने बिबी येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबईहून नागपूरकडे जाणार्या या आयशर ट्रकमध्ये एअर जेट ऑईलचे डब्बे व हॉस्पिटलची मशिनरी भरलेली होती. हा माल मुंबईहून कोलकात्याकडे जाणार होता. या अपघाताचा पुढील तपास बिबी पोलिस करत आहेत.
————–