– इन्शुलेटरची दाणादाण, सहा तासांपासून लाईट गुल!
– वीज कर्मचार्यांची रात्रीही धावाधाव!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – अवकाळी पावसाने आज, दि. १० एप्रिलरोजी ही बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील काही भाग झोडपून काढला. वादळ, विजांसह आलेल्या या जोरदार पावसाने पातूर तालुक्यातील सायवणी गावासमोरील मुख्य लाईनवरील आठ ते दहा इन्सुलेटर फुटल्याची माहिती आहे. त्यामुळे गेल्या सहा तासांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील पातूर व बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जवळजवळ ४० च्यावर गावे अंधारात आहेत. हे वृत्त लिहिपर्यंत म्हणजे रात्री 11 वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. तर रात्रीची वेळ असतानाही वीज वितरणचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मेहनत घेत होते.
काल ९ एप्रिलपासून अवकाळी पाऊस बुलढाणा व अकोला जिल्ह्याला झोडपत आहे. आजही खामगाव तालुक्यातील अटाळी, बोरी अडगाव, विहीगावसह काही भागात अवकाळी पाऊस झाला. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील सायवणीसह इतर भागातही वादळ विजांसह मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली. यामुळे कांदा, ज्वारी, फळबागासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर सायवणी परिसरातील पातुर करून येणार्या मुख्य लाईनवरील आठ ते दहा इन्सुुलेटर फुटले असून, लाईनवर इतरही बिघाड झाल्याची माहिती आहे. त्यामुळे या भागातील चान्नी सबस्टेशनमधील सुकळी, चरणगाव, चान्नी, चतारी, खेट्री, पिंपळखुटा, अडगाव, राहेर, उमरा, पांगरा, वसाली, सावरगाव, झरंडी, तसेच मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा सबस्टेशनमधील नायगाव देशमुख, मांडवा फॉरेस्ट, वडाळी, वागदेव, देऊळगाव साकरशा, मांडवासमेत डोंगर, पारखेड, पाथर्डी, मोहना सह इतर चाळीसच्यावर गावातील वीजपुरवठा गेल्या सहा तासापासून बंद आहे. यामध्ये पातूर तालुक्यातील सस्ती स्टेशनमधील गावातही लाईन नसल्याची माहिती आहे. हे वृत्त लिहिपर्यंत म्हणजे रात्री 11 वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता तर वीज वितरणचे संबंधित कर्मचारी वीज पुरवठा सुरू करण्यासाठी रात्रीही धावाधाव करीत होते. सायवणी परिसरात फॉल्ट सापडला असून, रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत होईल, असे देऊळगाव साकरशा येथील वीजवितरणचे विनोद राठोड, नीलेश राठोड यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.