बुलडाणा : सध्याच्या युगात पदवीसाठी अभ्यास करणे पुरेसे नसून जर आपल्याला रोजगार किंवा नोकरी हवी असेलतर कौशल्य विकास प्रशिक्षण सुद्धा खूप महत्वाचे आहे, सध्याच्या शैक्षणिक व्यवस्थेत गुणात्मक सुधारणा होणे गरजेचे असून ज्ञान आणि तंत्रविज्ञानाच्या युगात सर्वच क्षेत्रात क्रांती घडून आलेली आहे. त्यातून एक स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले आहे. अशा वेळी विद्यार्थी अथवा शिक्षक यांना शैक्षणिक समस्यांवर मात करून ध्येय सिद्ध करायचे असेलतर प्रशिक्षण, मार्गदर्शक व मार्गदर्शनाशिवाय पर्याय नाही. युवकांनी चंगळवादी दुनियेत गुरफटून न राहता वेळेला महत्व देऊन मोबाईलचा सावधपणे वापर करत अभ्यासाची कास धरावी, असे मार्गदर्शन प्रा.डॉ.एस.एम.कानडजे यांनी करुन शिक्षकीपेशा सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले.
शासकीय अध्यापक महाविद्यालयात पदवीदान संभारंभ बुधवार १३ जुलै रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.सीमा लिंगायत होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ.एस.एम.कानडजे होते. प्रमुख अतिथी प्रा.डॉ.अनिल वरघट तसेच या समारंभचे मुख्य आयोजक प्रा.डॉ.नूतन चव्हाण आणि प्रा.डॉ.हर्षानंद खोब्रागडे होते.
या पदवीदान संभारंभ सोहळ्याचे प्रास्ताविक प्रा. डॉ.नूतन चव्हाण यांनी करून आयोजनाची भूमिका मांडली. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य सीमा लिंगायत प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, शिक्षक हा समाजाचा आदर्श आहे. विद्याथ्र्यामधील अभिरुची, अभिवृत्ती, क्षमता आदी लक्षात घेऊन त्यांना शालेय जीवनाशी समायोजन साधण्यास प्रवृत्त व सहकार्य करणे गरजेचे आहे. उत्साहात पार पडलेल्या पदवीदान संभारंभात मागील वर्षीचे प्रथम प्राविण्यप्राप्त उपस्थित बि.एड. प्रशिक्षणार्थी कल्याणी सौंदडकर, अनघा पाटील, कुलदीप लहाने, शालिनी डुकरे, वर्षा आगाशे, प्रगती उमरकर, आरती खंडारे, वैशाली आमटे, रत्नमाला सुरडकर, सागर साळुंके यांना उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते पदवी देऊन विशेष सत्कार करून सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रा.राहुल हिवाळे, प्रा.संजीवनी सोनवणे, ग्रंथपाल प्रकाश डोंगरदिवे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रथम सत्राचे बि.एड.प्रशिणार्थी दिपाली फोकमारे, प्रांजल निमकर्डे यांनी केले तसेच स्वागत गीत अदिती देशपांडे व समूह यांनी सादर केले. आभार प्रदर्शन दीपाली आसोलकर यांनी व्यक्त केले.