शिवसेनेची (ठाकरे) पहिली यादी जाहीर; १७ उमेदवारांना संधी!
– पाच नावांची यादी वंचित आघाडीच्या भूमिकेनंतर जाहीर होणार
– उमेदवारांच्या नावाची यादी खा. संजय राऊत यांच्याकडून ट्वीटरवर जाहीर
मुंबई (खास प्रतिनिधी) – शिवसेना (ठाकरे) पक्षाची बहुप्रतिक्षीत अशी लोकसभा उमेदवारांची यादी आज शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी ट्वीटरवर जाहीर केली. १७ जणांची यादी जाहीर झाली असून उर्वरित पाच नावे वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेनंतर जाहीर केली जाणार आहे. बुलढाण्यातून अखेर प्रा. नरेंद्र खेडेकर यांना तर छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांनाच उमेदवारी जाहीर झाल्याने विविध चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
मुंबईतील चार जागा ठाकरे गट लढवणार आहे. दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबईतून अमोल कीर्तिकर, उत्तर पूर्व (ईशान्य) मुंबईतून संजय दिना पाटील, नाशिकमधून राजाभाऊ वाजे, तर छत्रपती संभाजीनगर येथून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय, कल्याण डोंबिवली, पालघर येथील उमेदवारांची अद्याप घोषणा झालेली नाही. कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीच्या जागेवरुन ठाकरेंनी उमेदवार जाहीर केला आहे. तर ईशान्य मुंबई या युतीत भाजपकडे राहिलेल्या जागेवरही ठाकरेंनी उमेदवार दिला आहे. हातकणंगलेच्या जागेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
शिवसेना ठाकरे गटाकडून १७ नावे जाहीर
१) नरेंद्र खेडकर-बुलढाणा
२) संजय देशमुख-यवतमाळ-वाशिम
३) संजोग वाघेरे पाटील-मावळ
४) चंद्रहार पाटील-सांगली
५) नागेश आष्टिकर-हिंगोली
६) चंद्रकांत खैरे-छत्रपती संभाजीनगर
७) ओमराजे निंबाळकर-धाराशिव
८) भाऊसाहेब वाघचौरे-शिर्डी
९) राजाभाऊ वाजे-नाशिक
१०) अनंत गीते-रायगड
११) विनायक राऊत-सिंधुदुर्ग, रत्नागिरी
१२) राजन विचारे-ठाणे
१३) अनिल देसाई- मुंबई दक्षिण मध्य
१४) संजय दिना पाटील-मुंबई ईशान्य
१५) अरविंद सावंत-मुंबई दक्षिण
१६) अमोल किर्तीकर-मुंबई वायव्य
१७) संजय जाधव-परभणी
शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात काल बैठक झाली होती. त्यात लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव कसा करायचा यासाठी रणनीती आखण्यात आली. शिवाय, कालच्या बैठकीत उमेदवारांच्या नावासंदर्भात आणि जागावाटपसंदर्भात दोन तास विस्तृत चर्चादेखील झाली. ठाकरे यांनी पहिली यादी जाहीर केली असली तरी, अद्याप चार ते पाच जागांवरील उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे. वंचित आघाडीच्या भूमिकेनंतर या चार ते पाच जागांवरील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांच्या वतीने मिळत आहे. अशातच ठाकरेंकडून कल्याणच्या जागेसाठीही अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. कल्याणमध्ये महायुतीकडून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जवळपास निश्चित आहे. श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरे गटाकडून केदार दिघेंना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे कल्याणमध्ये ठाकरेंकडून लोकसभेच्या रिंगणात कोण उतरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काँग्रेस नेत्यांची आज ‘दिल्लीवारी’
उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, काँग्रेस काही केल्या ही जागा सोडायला तयार नाही. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. काँग्रेस ही जागा लढवणारच असल्याची माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली. राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे याठिकाणाहून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, याच मुद्यावरुन काँग्रसचे नेते आज दिल्लीत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीची साथ सोडणार असल्याच्या बातम्या येत असतानाच, त्यांनी थेट मनोज जरांगे यांची भेट घेतल्याने राजकीय वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. त्यामुळे प्रकाश आंबेडकर तिसरी आघाडी तयार करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर हे आपली भूमिका आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करणार आहे. मात्र, त्यापूर्वी त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची रात्री उशिरापर्यंत बैठक घेतली. या बैठकीनंतर आंबेडकर थेट आंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी तासभर मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. या दोन्ही नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत वेळ आल्यावर नक्की सांगणार, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
————–