लोकसभेच्या मैदानात आंबेडकरांचे दलित, ओबीसी, मराठा-कुणबीचे ‘सोशल इंजिनिअरिंग’!
-
आंबेडकर महाविकास आघाडीतून बाहेर; मनोज जरांगेंना सोबत घेऊन सामाजिक आघाडी निर्माण करणार!
अकोला/मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – शिवसेना (ठाकरे) पक्षाने आपल्या १७ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर लगेचच वंचित बहुजन आघाडीनेदेखील आपल्या आठ जागांवरील उमेदवारांची यादी जाहीर केली. या दोन्ही याद्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. महाआघाडी फुटल्यात जमा असून, काही जागांवर मैत्रीपूर्ण लढाईचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, वंचित आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाचे योद्धे मनोज जरांगे पाटील यांची काल रात्रीच भेट घेऊन, त्यांच्याकडे तिसरी सामाजिक आघाडी स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आंबेडकर व जरांगे पाटील एकत्र येऊन उमेदवार देण्याचा निर्णय घेतला असला तरी, जरांगे पाटील हे आपली अधिकृत भूमिका ३० तारखेला मांडणार आहेत. राज्यात दलित, ओबीसी, मराठा-कुणबी असे सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करून महायुतीला पराभूत करण्याचा जोरदार राजकीय प्रयत्न यानिमित्ताने सुरू आहे.
अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीसोबत न जाण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकरांनी घेतला आहे. ओबीसी महासंघाशी युती करुन वंचित आघाडीने मतदारांसमोर तिसरा पर्याय ठेवला आहे. त्यामुळे मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही राज्यात तिसरी आघाडी अस्तित्वात आली आहे. या आघाडीत मनोज जरांगे पाटलांचाही समावेश होण्याची दाट शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी महासंघाशी युती जाहीर करत महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र डागले. यावेळी त्यांनी आठ जागांवर उमेदवारही जाहीर केले. भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिमसाठी आंबेडकरांनी उमेदवारांची घोषणा केली. त्यानुसार, भंडारा- गोंदिया: संजय गजानंद केवट, गडचिरोली-चिमूर: हितेश पांडुरंग मडवी, चंद्रपूर: राजेश वर्लुजी बेल्ले, बुलढाणा: वसंत राजाराम मगर, अकोला: प्रकाश आंबेडकर, अमरावती: प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान, वर्धा: प्रा. राजेंद्र साळुंखे आणि यवतमाळ-वाशिम : खेमसिंह प्रतापराव पवार यांना वंचित आघाडीने उमेदवारी दिली आहे. याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर म्हणाले, की मराठा आरक्षणासाठी लढा उभारणार्या मनोज जरांगे पाटील यांच्याशी काल चर्चा झाली. या निवडणुकीत जरांगे पाटील फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे. याबद्दल विचार करण्यात यावा, असे मी महाविकास आघाडीला सूचविले. पण त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. वंचितचा वापर घराणेशाही वाचवण्यासाठी केला जात होता. पण मी ते होऊ देणार नाही, असे म्हणत आंबेडकरांनी ठाकरे आणि पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. पुढे ते म्हणाले, की ‘काल राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यात काही निर्णय झालेत. काल रात्री मी मनोज जरांगे पाटील यांना भेटलो. विस्ताराने बोलणे झाले. त्यात ओबीसीसोबत आघाडीचा निर्णय घेतला गेला. मुस्लिम, जैन समाजाला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. जास्तीत जास्त उमेदवार गरीब वर्गातील असतील. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जरांगेंचे समर्थन असेल. ते त्यांची अंतिम भूमिका ३० तारखेला घेतील. जरांगेंनी ३० तारखेपर्यंत थांबायची विनंती केली. त्यांची विनंती मान्य केली. सर्वसामान्य लोकांना परिवर्तन हवे आहे. नवी आघाडी करतांना आमच्यावर टीका होईल. आरोप होतील. शेती, किमान आधारभूत मूल्य, कृषी आधारीत उद्योग हे मुद्दे घेऊन लोकांमध्ये जावू. जरांगे पाटलांसोबची नवी मैत्री हे सामाजिक गठबंधन असून, लोक हे स्वीकारतील. ओबीसींना आतापर्यंत खूप कमी वाटा मिळाला आहे. ओबीसी, भटके-विमुक्तांना अधिकाधिक उमेदवारी देणार असून, भाजपने मुस्लिमांना वेगळे पाडण्याचे जे राजकारण सुरू केले त्याला उत्तर म्हणून मुस्लीम उमेदवार देणार आहे. जैनांनाही प्रतिनिधित्व देणार आहे, असेही आंबेडकर म्हणाले.
वंचित आघाडीची पहिली उमेदवार यादी
१. भंडारा-गोंदिया : संजय केवट
२. गडचिरोली : हितेश पांडुरंग मडावी
३. चंद्रपूर : राजेश बेले
४. बुलढाणा : वसंतराव मगर
५. अकोला : प्रकाश आंबेडकर
६. अमरावती : प्राजक्ता पिल्लेवान
७. वर्धा : प्रा. राजेंद्र साळुंके
८. यवतमाळ-वाशिम : खेमसिंह पवार
दरम्यान, याबाबत मनोज जरांगे पाटलांशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, मी एकदा शब्द दिला की दिला. पण ३० तारखेपर्यंत मराठ्यांची भूमिका स्पष्ट झाल्याशिवाय ना कोणता उमेदवार आम्ही निवडला आहे, ना कोणाला पाठिंबा दिला आहे. ३० तारखेनंतर सगळं क्लिअर होईल. म्हणूनच मी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले होते, की मला हलक्यात घेऊ नका.
———–