– शिक्षणाचे बाजारीकरण, पालकांची लूट थांबवा – प्रशांत पाटील
चिखली (कैलास आंधळे) – चिखली तालुक्यासह जिल्ह्यातील खासगी शिक्षण संस्था मनमानीपणे अव्वाच्या सव्वा शैक्षणिक फी वसुली करत असून, सक्तीने सुरू असलेल्या या फी वसुलीमुळे पालकांची प्रचंड आर्थिक लूट सुरू आहे. याबाबत न्यायालयाने व शासनाने दिलेले आदेश अक्षरशः पायदळी तुडवले जात असताना, शिक्षण विभाग मात्र हेतुपुरस्सर कानाडोळा करून या संस्थाचालकांची पाठराखण करत असल्याचे दिसून येत आहे. पालकांची होणारी आर्थिक लूट थांबवा, व शिक्षणाचे बाजारीकरण रोखा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी केली आहे.
रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी शिक्षणमंत्री तथा शिक्षणाधिकरी यांना दिलेल्या पत्रात खाजगी शाळांकडून सक्तीची फी वसूल सुरू असल्याने पालक त्रस्त असून शिक्षण विभाग खासगी शाळांकडे दुर्लक्ष करून पाठीशी घालत असल्याचे म्हटले आहे. निवेदनात त्यांनी गट शिक्षणाधिकारी पं.स.चिखली अंतर्गत असलेल्या चिखली शहर व तालुक्यातील सर्व शाळांमध्ये आकारली जाणार्या फी संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असल्याने तालुक्यातील खासगी शाळांमध्ये ज्या वेगवेगळ्या फी आकारल्या जातात त्याबद्दल माहिती मागवली आहे. चिखली परिसरातील शाळेकडून मोठ्या प्रमाणात वेगवेगळी फी आकारली जात असून, पालकांची आर्थिक लूट होत असल्याचे प्रकार दिसून येत आहेत. त्यामुळे शाळेची अॅडमिशन फी, ट्युशन फी, स्टेशनरी फी, कॉम्पुटर फी, लायब्ररी फी, गेम फी ,स्कूल बस फी, टर्म फी, ट्रीप फी, प्रॉस्पेक्ट्स फी, समर कॅम्प फी, गॅदरिंग फी, स्कूल किट फी, स्कूल बस फी, शाळेपासून विद्यार्थ्यांच्या घराचे अंतर जेणे करुन त्यात आकारली जाणारी किलोमीटरनुसार बस फी, गाडीला लागणारे इंधन, शिक्षक व इतर कर्मचार्यांची संख्या व त्यांना दिल्या जाणार वेतन तसेच आकारली जाणारी एकूण फी, आरटीई अंतर्गत झालेल्या अॅडमिशन, रिक्त असलेल्या जागा त्या विद्यार्थ्यांकडून घेतली जाणारी अतिरिक्त फी या विषयी मागील पाच वर्षाची संपूर्ण माहिती मागवून सात दिवसापर्यंत देण्यात यावी, अशी मागणी गट शिक्षणाधिकारी मोरे यांच्याकडे केली आहे. शाळांच्या मनमानी कारभारामुळे बहुतांश खाजगी शाळांकडून पालकांची फीसंदर्भात पिळवणूक होत असल्याने पालकवर्ग त्रस्त झाले असून, वारंवार पाठपुरावा करूनदेखील शिक्षण विभाग खासगी शाळांना पाठीशी घालत असल्याचे दिसत आहे. चिखली शहरातील गुरुकुल नामक शाळेत तर १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेच्या वेळेपर्यंत हॉल तिकीट न दिल्याच्या तक्रारी आल्या असता दीपक सुरडकर व सचिन पडघान, अनिल वाकोडे, सचिन काकडे, भरत जोगदंडे, मनोज जाधव, भारत खंडागळे आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्याने विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले होते, तरी खाजगी शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेले शिक्षणाचे बाजारीकरण थांबवा, असे रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी म्हटले आहे.