सिंदखेडराजा ते शेगाव भक्ती महामार्ग रद्द करा; शेतजमिनींचे अधिग्रहण थांबवा!
सिंदखेडराजा/देऊळगावराजा (अनिल दराडे/राजेंद्र डोईफोडे) – राज्य सरकारने घोषणा केलेल्या मातृतीर्थ सिंदखेडराजा ते शेगाव या भक्ती महामार्गाला या भागातील शेतकर्यांचा तीव्र विरोध वाढला असून, त्याची दखल घेत माजी पालकमंत्री तथा या तालुक्यांचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून हा भक्ती महामार्ग रद्द करण्यात येऊन शेतकर्यांच्या जमिनीचे अधिग्रहण थांबवावे, अशी मागणी केली आहे. त्यावर आता राज्य सरकार काय भूमिका घेते, याकडे शेतकरीवर्गाचे लक्ष लागून आहे.
राज्य सरकारने सिंदखेडराजा ते शेगाव अशा या भक्ती महामार्गाची घोषणा केली आहे. त्या मार्गाचे सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले असून, या मार्गात येणार्या शेतजमिनी या सर्व पिकाऊ शेतजमिनी आहेत. येथे अल्पभूधारकांच्या जास्त शेतजमिनी येत आहे. भक्ती महामार्ग झाला तर हजारो शेतकरी भूमिहीन होणार असल्याची भीती शेतकर्यांत निर्माण झाली आहे. सिंदखेडराजावरून शेगावला जाण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत, म्हणून सिंदखेडराजा तालुक्यातील असंख्य शेतकर्यांनी या भक्तीमार्गाला सरळ सरळ विरोध दर्शविला आहे. त्यासाठी शेतकरी प्रशासनासमोर तीव्र आंदोलनेदेखील करत आहेत. या दोन्ही तालुक्यांचे आमदार असलेले डॉ. राजेंद्र शिंगणे यांनीदेखील लोकभावना लक्षात घेता, या महामार्गाला तीव्र विरोध दर्शविला आहे.
याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद आहे, की सिंदखेडराजा ते शेगाव या भक्ती महामार्गासाठी िंसदखेडराजा, देऊळगावराजा, चिखली, खामगाव व शेगाव या तालुक्यांतील ४३ गावांतील शेतकर्यांच्या शेतजमिनी अधिग्रहीत केल्या जाणार आहेत. या सर्व शेतजमिनी सुपिक व कसदार आहेत. सरकारच्या अधिग्रहण सूचनेमुळे शेतकरीवर्गात प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. तसेच, सदर ४३ गावांतील शेतकर्यांचा या भक्ती महामार्गाला तीव्र विरोध आहे. ग्रामपंचायतींनीदेखील ठराव घेऊन जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्यामार्फत मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर केलेला आहे. तेव्हा शेतकर्यांचा असंतोष पाहाता, या भक्ती महामार्गासाठी या ४३ गावांतील शेतजमिनी संपादीत करण्यात येऊ नये, तसेच प्रस्तावित सिंदखेडराजा ते शेगाव हा भक्ती महामार्ग रद्द करावा, अशी मागणीही आ. डॉ. शिंगणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे.
—————