Head linesPolitical NewsPoliticsVidharbha

लढवय्ये शेतकरी नेते, ‘देशोन्नती’कार प्रकाश पोहरेही लोकसभेच्या मैदानात!

– दिल्लीत लढवय्या शेतकरी नेता, अभ्यासू जननायक धाडण्याची उद्धव ठाकरेंना ऐतिहासिक संधी!

पुरूषोत्तम सांगळे
मुंबई/वाशिम – विदर्भातील लढवय्ये शेतकरी नेते, जननायक तथा ‘देशोन्नती’कार प्रकाश पोहरे हे लवकरच दिल्लीवर स्वारी करण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून त्यांनी वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे संकेत दिले असून, महाआघाडीत ही जागा शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या वाट्याला आहे. प्रकाश पोहरे यांच्यासारखा लढवय्या शेतकरी नेता, जननायक आणि अभ्यासू व आक्रमक संपादक लोकसभेत पाठविण्याची उद्धव ठाकरे यांना ऐतिहासिक संधी प्राप्त झालेली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहरे यांचे असलेले निकटचे संबंध पाहाता, ते शिवसेनेचे निश्चितच उमेदवार असतील, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. या मतदारसंघातील जातीय समिकरणे व महाआघाडीकडे दुसरा सक्षम उमेदवार नसणे, ही बाब पाहाता, पोहरे हे या मतदारसंघातून महाविकास आघाडीसाठी विजयाचा हुकुमी एक्का ठरणार आहेत.
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेत प्रकाश पोहरे.

वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. विद्यमान खासदार भावना गवळी या शिवसेनेच्या उमेदवारीवर सलग खासदार राहिलेल्या आहेत. परंतु, बंडखोरीमुळे त्यांची लोकप्रियता घसरली असून, शिंदे सेनेकडूनही त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर आहे. या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येत असून, चार मतदारसंघात भाजप तर दोन मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. त्यामुळे उमेदवार हा भाजपच्या चिन्हावर असावा, अशी मागणी भाजपकडून होत आहे. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही जागा सोडायला तयार नाहीत. माजी खासदार उत्तमराव पाटील यांचे चिरंजीव मनिष पाटील हे शिंदे सेनेकडून या मतदारसंघात उमेदवार राहू शकतात. घरात तब्बल सहा ते सातवेळा खासदारकी पाहिलेल्या व जिल्हा बँकेची धुरा सांभाळलेल्या या युवा नेत्याकडून शिंदे सेनेला विजयाची आशा आहे. तर महाविकास आघाडीत ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेची असल्याने येथून माजी मंत्री संजय देशमुख हे लढण्यास इच्छुक आहेत. परंतु, या मतदारसंघात देशमुख, पाटील-कुणबी व बंजारा मतांची समिकरणे पाहाता, देशमुख हे निवडूनच येतील, याची काहीही खात्री नाही. त्यामुळे ठाकरे यांनी देशमुख यांना अद्याप होकार कळवलेला नाही. ठाकरे यांच्या चार सभा या मतदारसंघात झालेल्या असून, ठाकरे यांनी उमेदवाराचे नाव जाहीर करणे टाळले आहे.
दुसरीकडे, प्रकाश पोहरे हे या भागातील लोकप्रिय शेतकरी नेते असून, सहकार क्षेत्रातील वजनदार नाव आहे. तसेच, शेतकर्‍यांसाठी रस्त्यावर उतरून त्यांनी अनेक लढे उभे व यशस्वी केले आहेत. शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी ते जेलमध्येदेखील गेलेले आहेत. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळेच शेतमालाला चांगला भाव मिळू शकला, तसेच शेतकरी आत्महत्येचा प्रश्न त्यांनी राष्ट्रीय पातळीवर नेल्यामुळेच तत्कालीन डॉ. मनमोहन सिंग सरकारला ऐतिहासिक कर्जमाफी करावी लागली होती. कापूसप्रश्नी त्यांनी उभे केलेले लढे हे ऐतिहासिक ठरलेले आहेत.
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी अतिशय सलोख्याचे संबंध राहिलेले पोहरे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, अशी सूचना स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी ते हयात असतानाच, पोहरे यांना दोनवेळेस केली होती. परंतु, त्यावेळेस पोहरे यांनी नम्रपणे ती ऑफर नाकारून शेतकरी चळवळ, सहकार क्षेत्र व पत्रकारितेत आपले योगदान देणे पसंत केले होते. आता पोहरे यांनी आपण वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना कळवले आहे. उद्धव ठाकरे हे काय निर्णय घेतात, याकडे या मतदारसंघातील जनतेचे व खास करून शेतकरीवर्गाचे लक्ष लागून आहे. पोहरे हे या मतदारसंघातून उभे राहिले तर महाविकास आघाडीच्या विजयाची फक्त औपचारिकताच उरणार आहे. कारण, शेतकरी, कष्टकरी या वर्गासह पाटील, कुणबी, देशमुख व इतर बहुजन समाज हा पोहरे यांचा हक्काचा मतदार आहे. नातेगोत्यांच्या राजकारणात पोहरे हे दिग्गज नेतृत्व आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना हा मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी ऐतिहासिक संधी लाभली आहे, अशी मतदारांत चर्चा आहे.


या मतदारसंघात महायुतीत शिवसेना शिंदे गटाने भावना गवळी यांना उमेदवारी देण्यास भाजपचा छुपा विरोध आहे. तर मंत्री संजय राठोड निवडणूक लढण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे मतदासंघातील जातीय समिकरणे पाहाता, सहकार क्षेत्रातील मनिष उत्तमराव पाटील या युवानेत्याला भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून पुढे आणले जात आहे. घरात वडिलांच्या रूपाने यापूर्वी सहा ते सातवेळा खासदारकी अनुभवलेल्या आणि स्वत: तब्बल १० वर्षे जिल्हा बँकेचा डोलारा सांभाळणार्‍या या युवानेत्यास भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षाकडून उमेदवारीबाबत विचारणा झाल्याची विश्वासनीय माहिती आहे. त्यामुळे महायुती ‘तुला न मला’ या उक्तीने ऐनवेळी काँग्रेसमधून उमेदवार आयात करून भाकरी पालटू शकते. असे झाले तरी मनिष पाटील यांच्य्ाासारखा नवखा उमेदवार प्रकाश पोहरे यांच्यासारख्या ज्येष्ठ, अभ्यासू, शेतकरी चळवळ व सहकार क्षेत्रातील बापमाणूस असलेल्या प्रकाश पोहरे यांच्यासमोर टिकाव धरणे अशक्य आहे, अशी राजकीय चर्चा आहे. तर दुसरीकडे, या मतदारसंघात कुणबी, मराठा, पाटील समाजाची मते ही पोहरे यांच्यासाठी हक्काची मते आहेत. एका राष्ट्रीय राजकीय पक्षाने केलेल्या आठव्या सर्वेक्षणातही प्रकाश पोहरे हे मैदानात उतरले तर किमान ६५ टक्के मते घेतील, असे सर्वेक्षण पुढे आल्याचे या पक्षाच्या वरिष्ठस्तरीय नेत्याने खासगीत बोलताना सांगितले आहे.


यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ हा सहा विधानसभा मतदारसंघांचा बनलेला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकत्रित शिवसेना पक्षाच्या भावना पुंडलिकराव गवळी या ५,४०,१०४ मते मिळवून विजयी झाल्या होत्या. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माणिकराव ठाकरे यांना दुसर्‍या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यामुळे भावना गवळी या एक लाख १७ हजार मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यापूर्वीही २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून भावना गवळी यांना ४, ७६,९३० मते मिळवून विजय प्राप्त झाला होता. तर
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अ‍ॅड. शिवजीराव शिवरामजी मोघे यांना दुसर्‍या क्रमांकाची मते मिळाली होती. मोघे हे ९३ हजार मतांनी पराभूत झाले होते. या मतदारसंघात कुणबी-पाटील, बंजारा व त्यानंतर दलित व देशमुख समाजाची मते महत्वपूर्ण मानली जातात. पोहरे हे कुणबी-पाटील आहेत, तर त्यांचे नातेसंबंध देशमुखांशी आहेत. त्यामुळे ते सर्वांना चालतात, असे सामाजिक चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!