– राज्यातील ७ जागांवर महायुतीच्या जागावाटपाचे घोडे अडले!
मुंबई/नवी दिल्ली (खास प्रतिनिधी) – महायुतीत जागावाटपावरून अभूतपूर्व पेच निर्माण झाला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकीय कोंडी झाली आहे. शिंदे गटाला ९, पवार गटाला चार जागा सोडल्या जात असल्याने या दोन्ही नेत्यांवर प्रचंड दबाव निर्माण झालेला आहे. या दोन्ही पक्षांतील अनेकजण घरवापसी करण्याच्या तयारीत असून, शिंदे गटातून काहींचा सरकारमधून बाहेर पडण्यासाठी दबाव निर्माण झाला असल्याची खात्रीशीर माहितीही प्राप्त झाली आहे. त्यामुळे राज्यातील सरकार वाचवायचे, की शिंदे-पवार यांना जागा द्यायच्या अशा पेचात भाजपचे नेतृत्व अडकले आहे. दरम्यान, आज जागावाटपाबाबत नवी दिल्लीत महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. आज किंवा उद्या भाजपची दुसरी यादी जाहीर होऊ शकते, असे राजकीय सूत्राने सांगितले आहे.
एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या अनेक जागांवर भाजपने दावा केला आहे. त्यासाठी पक्षांतर्गत झालेल्या सर्वेक्षणाचा दाखला भाजपकडून दिला जात आहे. या शिवाय, शिंदे-पवार यांच्यातही काही जागांवरून वाद आहे. बुलढाणा, मावळ व परभणी या जागा अजित पवार यांना हव्या आहेत, तर तेथे शिंदे गटाचे विद्यमान खासदार असून, त्यांच्यासाठी शिंदे हे या जागा मागत आहेत. बुलढाणा ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची असून, या मतदारसंघातून शेतकरी नेते रविकांत तुपकर हे विजयी होतील, असा अजित पवार यांचा होरा आहे. तुपकरांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन खासदार करू शकतो, असे अजित पवार यांनी भाजपला कळवले असल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने खासगीत बोलताना सांगितले आहे. या शिवाय, भाजपने शिंदे व पवार यांच्या एकूण ७ जागांवर दावा केलेला असून, या जागा भाजप हे शिंदे यांना कोणत्याही परिस्थितीत सोडण्यास तयार नाही.
रामटेक, यतमाळ-वाशिम, कोल्हापूर व बुलढाणा या जागांवरील विद्यमान खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आपल्या जागा कोणत्याही परिस्थितीत भाजपला सोडू नका, असा दबाव निर्माण करून आहेत. तर शिंदे गटातील अनेकांनी सरकारमधून बाहेर पडा, पण भाजपच्या दबावात येऊ नका, असाही खासगीत सूर लावल्याने शिंदे यांची चांगलीच कोंडी झाली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे नेते आज पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला जाणार असून, आजच जागावाटपाबाबत निर्णायक बैठक होणार आहे. भाजपला आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करायची असल्याने आज सोमवारी जागावाटप व उमेदवारांची नावे फायनल होतील, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठस्तरीय सूत्रांनी दिली आहे.
———–