बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – युवक म्हणून स्वप्न मोठी बघा, नंतर प्लॅन करा नंतर अॅक्शन, यशस्वी होण्यासाठी आवड, निवड व सवड याची सांगड घालता आली तोच खरा युवक, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी केले. भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा विभागाअंतर्गत कार्यरत नेहरु युवा केंद्र बुलढाणा व्दारा व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन दि. 07 मार्च रोजी जिल्हा क्रीडा संकुल, बुलढाणा येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. मुख्य कार्यक्रारी अधिकारी विशाल नरवाडे हे होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी शरद पाटील, उपविभागीय पोलिस अधीक्षक सुधीर पाटील, नेत्रतज्ञ तथा व्याख्याते डॉ. विकास बाहेकर, जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे व जिल्हा क्रीडा अधिकारी बी.एस.मानकर हे होते.
जिल्हा युवा संसद व जागतिक महिला दिना निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाच्या सुरुवातील राष्ट्रामाता जिजाऊ,सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी अभिवादन करुन दीप प्रज्वलीत केले. या नंतर मतदार जागृती पोष्टरचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आपल्या मार्गदर्शनात जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी सांगितले की, युवकांसाठी मोबाईल/ स्मार्टफोन सायलंट किलर आहे. याच्या उदाहरणार्थ त्यांनी सांगितले की, एखादा दारु पिणारा, गुटका खाणारा व्यसनी माणून दिसतो त्याला एखादा आजार कशामुळे झाला आहे हे कळते पण मोबाईल हा दररोज मारतो, म्हणून युवक युवतींनी या पासून सोशस डिसटंस ठेवावे. भारताचे सुज्ञ नागरिक म्हणून मतदान हेच श्रेष्ठ दान आहे. म्हणून सर्वांनी मतदान करावे. भारतात सर्वात जास्त युवकांची संख्या आहे. युवक म्हणून स्वप्न मोठी बघा, नंतर प्लॅन करा नंतर अॅक्शन, यशस्वी होण्यासाठी आवड, निवड व सवड याची सांगड घालता आली तोच खरा युवक. आईवडील मोठया मेहनतीनं कष्टाने आपल्याला शिकवताय, आपल्याला शहराचं वार लागू देवू नका. युवक म्हणून तुम्ही काहीही करु शकता, तुमच्या मध्ये अमर्याद सामर्थ्य आहे. स्वत:शी संवाद साधा, आज मी काय चांगले काम केले हे स्वत:ला विचारा, हे जे करु शकतील त्यांना चांगला फीडबॅक मिळेल. प्रत्येकाकडे 24 तास आहे ते कसे सन्मार्गी लावायचे की वाया जावू दयायचे ते तुमचं तुम्हाला ठरवायचंय, त्याकरीता स्वत:शी संवाद साधावा असे त्यांनी सांगितले.
डॉ.विकास बाहेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, संवेदनशील विवेकवादी समाज निर्माण करण्याची जबाबदारी आजच्या युवकांवर आहे. वाडवडीलांनी दिलेले संस्कार विसरु नका, सध्या शिक्षणाची अवस्था वाईट झालेली दिसते, ज्यांनी शिक्षणाची परतारणा केली त्यांना वाईट परिस्थीतीचा सामना करावा लागेल.तर प्राचार्य डॉ.प्रशांत कोठे यांनी समयोजित भाषण केले. कार्यक्रमाच्या दुस-या सत्रात जिजामाता महाविद्यालयातील राज्यशास्त्र प्रमुख डॉ.जे.जे.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या अभिरुप युवा संसदेचे सादरीकरण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या लोकशाही प्रणाली व संसदीय कामकाज पध्दतीची माहिती युवकांना देण्यात आली. या कार्यक्रमा दरम्यान मतदार जागृती अभियान या विषयावर शिवाजी काटे आई रेणूका लोककला संच मेहकर व एएसपीएम आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी पथनाटय सादर केले. या पथनाटय टिमला व ऑनलाईन घेण्यात आलेल्या युवा संसद भाषणस्पर्धेतील प्रथम विजेत्या कु. श्रुती तायडे, व व्दितीय कु. ऋतुजा इंगळे यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर यांनी तर आभार प्रदर्शन अजयसिंग राजपूत यांनी व वैविध्यपुर्ण संचलन गुड इव्हीनिंगसिटीचे रणजितसिंग राजपूत यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोप संमारंभात अभिरुप युवा संसदेतील सहभागींना स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. समारोप समारंभाचे संचलन स्वयंसेवक सुमित वाकोडे यांनी केले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने जिजामाता महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रम अधिकारी, डॉ.डी.जे.कांदे, एनसीसी अधिकारी, प्रा. पवन ठाकरे, कला महाविद्यालयाचे डॉ. विलास टाले, राजश्री शाहू महाविद्यालयाचे प्रा. रोहित सालकुटे, संत गजानन महाराज फार्मसी कॉलेजचे प्रा.पवन जगताप व शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे एस.ए.डोंगरदिवे, जे.व्ही. जोगदंड, सौ.जे.डी.पवार. ए.एस.गोसावी, कु.ए.एस.झगरे, कु.पी.ए.पवार, ए.एस.सुर्यवंशी, ए.एसएस.चवरे, एस.एन.खर्चे, एस.के.बुरकुल, व्ही.डी.सावळे, एस.एस. कराळे, युथवेल संचालक राजेश शेळके हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व महाविद्यालयातील युवक युवती मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी तेसाठी नेहरु युवा केंद्राचे धनंजय चाफेकर, विलास सोनोने, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक, सुमित वाकोडे, देवानंद नागरे,उमेश बावस्कर, शीतल मुंढे, सुरज बोरसे आदिंनी परिश्रम घेतले.
————–