– निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून महिलांना भूलविण्याचा प्रयत्न!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – कोरोना काळापासून रेशनकार्ड धारकांना मोफत धान्य वितरत करण्यात येत आहे. तसेच राज्य सरकारतर्पेâ आनंदाचा शिधादेखील देण्यात येतो. दरम्यान, आता रेशनकार्ड दुकानावर अन्नधान्याबरोबरच साडीही मिळणार आहे. राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाने या संदर्भातील निर्णय घेतला आहे.तालुक्यातील अंत्योदय रेशनकार्ड धारकांना मोफत साडी वाटपासाठी २६९० साड्या दाखल झाल्या आहेत.
येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास आचारसंहितेत साडी वाटप अडकणार असल्याची शक्यता आहे,त्यामुळे साड्या उपलब्ध झाल्यानंतर तातडीने त्या लाभार्थी कुटुंबांना वितरित कराव्यात, अशा सूचना पुरवठा विभागाने रेशन दुकानदारांना दिल्या आहेत. परंतु, साड्या घेण्यासाठी दुकानात येणार्या लाभार्थी विशेषत: महिला वर्गाकडून साड्यांच्या रंगासाठी आग्रह धरला जात आहे. त्यामुळे मोफत साडी वितरण हे दुकानदारांसाठी अडचणीचे ठरते आहे. राज्यातील अंत्योदयशिधापत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी रेशन दुकानावर मोफत मिळणार आहे. विशेष म्हणजे, शासनाने निश्चित केलेल्या सणदिवशी या साडीचे वाटप होणार आहे.
राज्य शासनाकडून दिला जाणार निधी!
राज्य यंत्रमाग महामंडळ ही संस्था ही योजना राबवणार आहे. २०२३- २४ या वर्षाकरिता महामंडळ एक साडी ३५५ रुपयांना खरेदी करणार आहे. या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, वाहतूक, जाहिरात, प्रसिद्धी, साठवणूक, हमाली यांसाठी येणारा खर्च महामंडळाला राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे. वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार ही योजना २०२३ ते २०२८ या पाच वर्षासाठी निश्चित करण्यात आली आहे. या सर्व कुटुंबांना पुढील पाच वर्षे प्रत्येक वर्षी एक याप्रमाणे साडीचे मोफत वाटप केले जाणार आहे.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्णय : प्रमोद घोंगे
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्तमान सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. महिलांना निवडणुकीच्या काळात खुश करण्यासाठी वर्तमान सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत आणि याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आता अंत्योदय रेशन कार्डधारक कुटुंबातील महिलांना दरवर्षी मोफत एक साडी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांना साडी नाही तर गॅस स्वस्त हवा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रमोद घोंगे यांनी व्यक्त केले आहे.