Breaking newsBuldanaBULDHANAHead linesKhamgaonVidharbha

विदर्भपंढरी शेगावनगरीत लाखो भाविकांची मांदियाळी; ‘श्रीं’चे मंदीर आज रात्रभर खुले!

– शेगावात साडेआठशे दिंड्या दाखल; शेगावनगरी दुमदुमली!

शेगाव (बाळू वानखेडे) – योगीराज सदगुरू श्री संत गजानन महाराज यांचा १४६ वा प्रगटदिन उत्सव आज (दि.३) विदर्भपंढरी शेगावनगरीत भल्या पहाटेपासून उत्साहात सुरू झाला आहे. काल रात्रीपासून ‘श्रीं’चे अहोरात्र दर्शन सुरू असून, मंदीर चोवीस तास सुरू आहे. आजही भक्तप्रतिपालक असलेले दयाळू श्री संत गजानन महाराज हे राज्यभरातून आलेल्या सुमारे तीन लाखांपेक्षा जास्त आपल्या भक्तांना रात्रभर दर्शन देणार आहेत. ‘हळू हळू बोला, मुखाने गजानन बोला’च्या गजरात विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या शेगाव शहरात राज्यातून तब्बल ८५० दिंड्या दाखल झाल्या असून, संस्थानच्या नियमांची पूर्तता करणार्‍या भजनी दिंड्यांना भजनसाहित्याचे वाटप करण्यात आले आहे. यानिमीत्ताने ‘श्रीं’च्या मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून, संतजयघोषणाने मंदीर परिसर दुमदुमून गेला आहे. शांततेत व शिस्तीत दर्शनबारी सुरू आहे. भक्तांची गर्दी पाहता गैरसोय होवू नये, काल व आज, ३ मार्चरोजी ‘श्रीं’चे मंदीर भाविकांसाठी रात्रभर खुले राहणार आहे.

भल्या पहाटेपासूनच श्रींच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून, टाळ मृदंगाच्या गजराने शेगावनगरी दुमदुमली आहे. श्रींच्या समाधी मंदिरावर, परिसर आणि प्रवेशद्वारावर रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दि. २५ फेब्रुवारीपासून श्रींच्या प्रकटदिन उत्सवास महारुद्रस्वाहाकारने प्रारंभ झाला आहे. श्रींच्या मंदिरात दररोज काकडा, भजन, दुपारी प्रवचन सायंकाळी हरिपाठ, आणि रात्री कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. राज्यभरातून ठिकठिकाणच्या सुमारे साडेआठशे भजनी दिंड्या संतनगरीमध्ये दाखल झाल्या आहेत. संपूर्ण विदर्भात मोठ्या भक्तिभावाने व उत्सवात हा प्रकट साजरा केला जात आहे. श्री संस्थानकड़ून विसावा भक्त निवास संकुल येथे भजनी दिंड्यांची नोंदणी सुरूच असून, नियमांची पूर्तता करणार्‍या भजनी दिंड्यांना वीणा, हतोड़ी, दहा टाळ, मृदंग, माऊली पताका आदि भजनी साहित्य व श्री तुकाराम गाथा, श्री ज्ञानेश्वरी व एकनाथ भागवत या साहित्याचे वितरण केले जात आहे. वारकरी व भक्तांची चोख व्यवस्था संस्थानकड़ून करण्यात आलेली आहे. आज (दि.३) प्रगटदिनाच्या मुख्य सोहळ्यानिमित्त १० वाजता श्रींच्या मंदिरात महारूद्रस्वाहाकार यागाची पूर्णाहुती पार पडली. यावेळी कीर्तनसेवा झाली. दुपारी चार वाजता श्रींची पालखी परिक्रमा निघेल. त्यानंतर मंदिरात महाआरती व ड़ोळयांची पारणे फेड़णारा रिंगण सोहळा होवून पालखी परिक्रमेची सांगता होणार आहे. उद्या, दि. ४ मार्च रोजी काल्याच्या कीर्तनाने प्रकटदिन उत्सवाची यशस्वी सांगता होईल. दरम्यान श्रींच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने गैरसोय होवू नये, यासाठी काल, २ मार्च व आज, ३ मार्च रोजी मंदिर रात्रभर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहे, तसेच श्रींच्या मंदिरावर, प्रवेशद्वार व इतर ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाईदेखील करण्यात आली आहे. प्रकटदिनानिमित्त विविध सामाजिक संस्थांकड़ूनदेखील महाप्रसादाचे वाटप करण्यात येत आहे तसेच विविध रोगनिदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.


प्रकटदिन उत्सवाचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे..

आज श्रींचे मंदिरामध्ये सकाळी १० वाजता या महारुद्रस्वाहाकार यागाची पूर्णाहुती पार पडली. त्यानंतर १२ वाजेपर्यंत कीर्तनसेवा पार पडेल. दुपारी चार वाजता श्रींची पालखी परिक्रमा मंदिरामधून शहरातील परिक्रमा मार्गाने निघेल. सायंकाळी ही परिक्रमा संपवून पालखी परत मंदिरात पोहोचेल. मंदिरात महाआरती व वारकर्‍यांचा नयनरम्य असा रिंगण सोहळा पार पडेल. त्यानंतर पालखी परिक्रमेची सांगता होईल. उद्या, ४ मार्च रोजी सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत काल्याचे कीर्तनाने श्रींच्या प्रकटदिन उत्सवाची सांगता होणार आहे.


मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन

भाविकांसाठी स्थानिक अग्रसेन भवन येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. माधवबाग अकोला (आकाशवाणी), श्री गजानन सेवा समिती व स्व. ओमप्रकाश रामगोपाल गोयनका ट्रस्ट यांच्या सयुंक्त विद्यमाने मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच स्थानिक अग्रसेन भवन येथे सकाळी ११ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत या शिबिरात हृदयरोग निदान तपासणी व अन्य तपासण्या केल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!