‘सरकारने मला तुरूंगात डांबलं तर तुम्हीच रविकांत तुपकर समजून निवडणूक लढा!’
– “तुपकरांना जेल की बेल”; जिल्हा न्यायालय आता २१ फेब्रुवारीला देणार अंतिम फैसला!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – सरकारने मला जेलमध्ये टाकले तरी तुम्ही पूर्णपणे निवडणुकीची जबाबदारी उचला, तुम्ही स्वतःच रविकांत तुपकर म्हणून लोकांसमोर जा.. ही निवडणूक माझी नसून तुमच्या सर्वांची आहे, तुमच्या भरवश्यावर आहे, त्यामुळे ताकदीने कामाला लागा. ‘एक वोट एक नोट’ देण्याचा निर्धार लोकांनी केला आहे, त्यामुळे गावागावात पोहोचा, जनतेच्या समर्थनावरच ही निवडणूक आपल्या ताकदीने लढवायची आहे, असे भावनिक आवाहन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी काल मतदार, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना केले होते. शेतकरी आंदोलनातील तुपकरांचे सर्व जामीन रद्द करण्यात येऊन त्यांना जेलमध्ये ठेवावे, अशी मागणी राज्यातील एकनाथ शिंदे सरकारने जिल्हा न्यायालयाकडे केलेली आहे. तुपकरांना जेलमध्ये डांबून लोकसभा निवडणुकीतून त्यांना बाद करण्याचा सरकारचा पळपुटा डाव दिसतो आहे, या पार्श्वभूमीवर तुपकर हे बुलढाण्यातील निर्धार मेळाव्यात बोलत होते. दरम्यान, तुपकरांना पुन्हा जामीन मिळतो की तुरुंगात जावे लागते, यावर आता २१ फेब्रुवारीरोजी फैसला होणार आहे. याप्रकरणी न्यायालयात आज, १६ फेब्रुवारीरोजी पुन्हा एकदा दोन्ही पक्षांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला असून, आता दि. २१ फेब्रुवारीरोजी नेमका काय निकाल लागतो, याकडे संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.
काल, दि. १५ फेब्रुवारीला दुपारी बुलढाणा येथील गर्दे सभागृहात शेतकरी, शेतमजूर, आणि सुज्ञ मतदारांसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा निर्धार मेळावा पार पडला. येणार्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित या मेळाव्याला जिल्ह्याभरातील हजारो तुपकर समर्थकांची मोठी गर्दी गर्दे सभागृहात व सभागृहाबाहेर उसळली होती. यावेळी आपल्या आक्रमक भाषणातून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी लोकसभा लढविण्याचा आपला निर्धार हजारो चाहत्यांच्या आग्रहास्तव व त्यांच्या साक्षीने जाहीर केला. यावेळी टाळ्यांचा एकच कडकडाट झाला होता. आपण मागील २२ वर्षांपासून शेतकरी चळवळीत काम करतो. घरदारावर तुळशीपत्र ठेवून आंदोलन करतोय. शेकडो केसेस दाखल झाल्या, अंगावर पोलिसांच्या लाठ्या खाल्या, तुरुंगात गेलो, घरापासून सहा सहा महिने दूर राहिलो, तडिपारी भोगली. २२ वर्षांत शेतकरी, शेतमजूर, कामगार, युवकांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला. अचानक गोधडीतून उठलो आणि लोकसभा लढणार असे नाही म्हटले, आधी काम केले आणि शेतकरी, तरूण व सर्वसामान्यांच्या आग्रहास्तव आपण लोकसभा लढण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता माघार नाही. मी जेलात गेलो तरी, हवालदिल व दुःखी होऊ नका, टेन्शन घेऊ नका, असे ते म्हणाले. विरोधकांची भीती न बाळगता संयम बाळगून झंझावाती प्रचार करा. ही लढाई रविकांत तुपकरांना खासदार करण्याची नसून गावगाड्यातील सर्वसामान्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. सोयाबीन-कापसाच्या भावाचे धोरण दिल्लीत ठरते, त्यामुळे लोकसभेत जाणे आवश्यक आहे. म्हणून यंदा कोणत्याही स्थितीत थांबायचे नाही असा निर्धार गावगाड्यातील माणसांनी व शहरातील नागरिकांनी केला आहे. गेल्या दोन निवडणुकात ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांच्या पक्षादेश मानून थांबलो. पण आता काहीही झालं तरी थांबू नका, असा जिल्हावासीयांचा आग्रह आहे. मी सर्वसामान्य माणसांचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे आता काही झाली तरी बुलढाणा लोकसभा लढण्याचा निर्णय पक्का झाला आहे. त्यासाठी आता तुम्हीदेखील ताकदीने कामाला लागा, असे आवाहन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी हजोरोंच्या संख्येने आलेल्या समुदयाला केले होते.
सोयाबीन कापूस उत्पादक शेतकर्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकरांनी आजवर विविध आंदोलने केली आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. याच दरम्यान रेल्वेरोको आंदोलन होण्यापूर्वीच पोलिसांनी तुपकरांना अटक केली होती. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५१ (३) अन्वये १८-०१-२०२४ रोजी तुपकरांना अटक करून १९-०१-२०२४ रोजी न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी बुलढाणा यांचे समक्ष हजर करून तुरुंगात पाठविण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने उभय पक्षांचे युक्तिवाद ऐकून पोलिसांची विनंती फेटाळून लावली व तुपकर यांची मुक्तता केली होती. त्या आदेशांविरोधात बुलढाणा शहर पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालय बुलढाणा येथे पुनरनिरीक्षण अर्ज दाखल केला आहे. तसेच त्यामध्ये तुपकरांच्या इतर आंदोलनाच्या गुन्ह्यांचा संबध जोडून त्यांना अटकेत ठेवण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी यापूर्वी ७ व ८ फेब्रुवारीरोजी सुनावणी झाली. त्यावेळी रविकांत तुपकर स्वतः न्यायाधीशांच्या समोर हजर झाले होते. तर त्यांच्यावतीने त्यांच्या सुविद्य पत्नी अॅड. शर्वरी तुपकर यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवत १५ फेब्रुवारीरोजी अंतिम सुनावणी ठेवली होती. परंतु, तुपकरांच्यावतीने अॅड. शर्वरीताई तुपकर यांनी दाखल केलेल्या कायदेशीर पुराव्यावर युक्तिवाद करण्यासाठी सरकारी पक्षाने वेळ मागितल्याने प्रकरणाची सुनावणी आज, १६ फेब्रुवारीला ठेवण्यात आली. त्यानुसार रविकांत तुपकर पुन्हा न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयात दोन्ही पक्षांनी पुन्हा जोरदार युक्तिवाद केला. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने ऐकून घेतल्यानंतर निकाल राखून ठेवला आहे. दि.२१ फेब्रुवारीरोजी या प्रकरणाचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे. रविकांत तुपकर यांना जामीन मिळणार की तुरुंगात जावे लागणार, यासाठी आता सर्वांना दि.२१ फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार असून, या निकालाची संपूर्ण राज्याला उत्सुकता लागून आहे.
.. सांगितला पुढचा प्लॅन!
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन रविकांत तुपकर म्हणाले होते, की जर मी जेलमध्ये गेलो तरी तुम्ही पूर्णपणे निवडणुकीची जबाबदारी उचला, तुम्ही स्वतःच रविकांत तुपकर म्हणून लोकांसमोर जा.. ही निवडणूक माझी नसून तुमच्या सर्वांची आहे, तुमच्या भरवश्यावर आहे, त्यामुळे ताकदीने कामाला लागा. ‘एक वोट एक नोट’ देण्याचा निर्धार लोकांनी केला आहे, त्यामुळे गावागावात पोहोचा, जनतेच्या समर्थनावरच ही निवडणूक आपल्या ताकदीने लढवायची आहे, असे आवाहन शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी केलेले आहे.
—————