– घाटाखाली व घाटावर जिल्ह्याच्या दोन्ही भागांत अवकाळी पावसाने शेतीपिकांचे नुकसान
– मागील नुकसानीचेच पैसे मिळाले नसताना शेतकर्यांवर आता नवे संकट कोसळले!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यातील घाटाखालील तालुके व घाटावरील तालुके अशा चोहीकडे काल व आज जोरदार अवकाळी पावसाने गारपिटीसह बळीराजाला दणके दिले. शेगावसह तालुक्यातील काही भागात तर वीज, सोसाट्याच्या वार्यासह पाऊस पड़ला. अंगावर वीज पडून शेगाव तालुक्यातील टाकळी हाट येथील तरूणाचा जागीच मृत्यू झाला. चिखली, मेहकर, खामगाव, लोणार, बुलढाणा, देऊळगावराजा, शेगाव या तालुक्यांत या अवकाळी पावसाने दाणादाण उडवली होती. या पावसाने काढणीला आलेला गहू, हरभरा तसेच कांदासह आंब्यांचा मोहोर, फळबागा व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आजदेखील जिल्ह्याच्या काही भागात पाऊस सुरूच होता. मागील वर्षाच्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई अद्यापही शेतकर्यांना मिळालेली नाही. एक रुपयाचा पीक विमा हेही सरकारने शेतकर्यांना दिलेला लॉलीपॉप ठरले असताना हे नवे संकट शेतकर्यांवर कोसळ्याने शेतकरी पुरता हादरून गेलेला आहे.
हवामान विभागाने जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यात काल, १५ फेब्रुवारीला सायंकाळी अवकाळीचा जोरदार तडाखा बसला. या अवकाळी पावसाने रब्बी पिकावर मोठा परिणाम झाला असून, गहू, हरबरा, तूर, कांदा पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आलेला आहे. शेगांव तालुक्यातील टाकळी विरो येथे अंगावर वीज पडल्याने एका युवकाचा मृत्यू झाला. सूरज निंबाळकर असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव असून, सायंकाळी पेट्रोल पंपावर कामासाठी तो घरून निघाला होता, रस्त्यातच त्याच्या अंगावर वीज कोसळली व त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. यावर्षी पावसाळ्यात पाऊस जेमतेम झाला असून, मुख्य पीक सोयाबीनला एलो मोझॅकने नेस्तनाबूत केले तर कपाशी बोंड़अळीने फस्त केली होती. सुरूवातीला पाऊस लांबल्याने उड़ीद, मूग ही पिके दाळींनाही झाले नाहीत. त्यातच नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह तूर, हरभरा पिकांचे नुकसान झाले. एकरी दोन पोते सोयाबीनला झड़ती आली. त्यामुळे खर्चही निघाला नाही. तर मालाला भाव नसल्याने संकट आणखी गड़द होत चालले आहे. निदान खर्च वसूल होईल या भाबड्या आशेने रब्बी हंगामात गहू, हरभरासह कांदा लागवड शेतकर्यांनी केली होती. परंतु, काल व आज जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतीपिकांची नासाडी करून ठेवली.
खामगाव तालुक्यातील शिरजगाव देशमुखसह इतर भाग, शेगावसह तालुक्यातील जलंब, माटरगावसह इतर शिवारात, तसेच चिखली, बुलढाणा, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा-देऊळगावराजा या तालुक्यांतील काही भागांत वीज, सोसाट्याचा वारा व जोरगार गारपीटसह पाऊस कोसळला. संकटामागून संकटे झेलून शेतकरी खचला आहे. शासनाने आर्थिक मदत देवून शेतकर्याला धीर द्यावा, अशी मागणी होत आहे. मागील वर्षाच्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई अद्यापही शेतकर्यांना मिळालेली नाही, एक रुपयाचा पीकविमा हेही सरकारने शेतकर्यांना दिलेला लॉलीपॉप ठरले आहे, शेतकर्यांचे पंचनामे होऊनसुद्धा पीकविम्याची रक्कम अद्यापही शेतकर्यांच्या खात्यात जमा झालेली नाही आणि आज जेव्हा गारपीटमुळे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे तर विमा कंपनीही शेतकर्यांची तक्रार घेत नाही, असा संतापजनक अनुभव शेतकर्यांना येत आहे. तसेच, लोकप्रतिनिधीही शेतीबांधाकडे फिरकलेले नाहीत.
—————–