खडकपूर्णा नदीपात्रातील वाळूतस्करी रोखण्यासाठी अचानक छापे, धरपकड!
– सिंदखेडराजा-देऊळगावराजा तालुक्यांत महसूल विभागाच्या धाडसी कारवाया!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – अवैध रेती उत्खनन थांबविण्यासाठी महसूल विभागाने जोरदार मोहीम हाती घेतली असून, वाळूतस्करांना चांगलेच दणके देणे सुरू आहे. उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड यांच्या नेतृत्वात धाडसी कारवाई करत, रेती उत्खनन करणाऱ्या तीन बोटी फायबर सेक्शन पाईप इंजिन व इतर साहित्य जप्त करून एनडीआरएफ च्या पथकामार्फत जागेवरच नष्ट केल्याने रेती माफियामध्ये दहशत पसरली आहे. दरम्यान, अवैध रेती उत्खनन व वाहतूक होऊ नये, यासाठी महसूल नायब तहसीलदार डॉ. अस्मा मुजावर आणि त्यांचे पथक अवैध रेती वाहतुकीवर करडी नजर ठेवून आहेत. त्यामुळे अवैध रेती वाहतुकीला मोठा चाप बसणार आहे.
देऊळगावराजा तालुक्यामध्ये अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड, देऊळगावराजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ व पथकातील, महसूल नायब तहसीलदार डॉ. अस्मा मुजावर आणि मंडल अधिकारी व तलाठी यांच्यासह मेहुणाराजा शिवारामध्ये खडकपूर्णा प्रकल्प क्षेत्रामध्ये 8 तारखेला अवैध रेती उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारी 1 बोट, फायबर, सेक्शन पाईप जोडणी केलेले प्रत्येकी 100 फुट जोडणी केलेले एकूण 03 नग तसेच, दिनांक 12 तारखेला अवैध रेती उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारी 1 बोट, फायबर, इंजीन, सेक्शन पाईप जोडणी केलेले, आणि दिनांक 13 फेब्रुवारीला अवैध रेती उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारी 1 बोट, फायबर, सेक्शन पाईप जोडणी आदी साहित्य जप्त करून एनडीआरएफचे पथक बोलावून त्यांच्यामार्फत सदर अवैध रेती उपसा करणारे बोटीसह इतर साहित्य जागेवरच नष्ट करण्यात आले. यापुढेही बोटीच्या सहाय्याने अवैध रेती उत्खननचा प्रयत्न झाल्यास NDRF चे पथकाच्या मार्फत कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड यांनी दिला आहे. महसूलच्या दणक्यांनी रेतीमाफियामध्ये चांगलीच दहशत पसरली आहे.