जरांगे पाटलांच्या नाकातून रक्त; तब्येत प्रचंड बिघडली!
– शिंदे-फडणवीस सरकारने फसविल्याचा जरांगे पाटलांचा आरोप!
अंतरवली सराटी, जि. जालना (खास प्रतिनिधी) – ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीवरून तीव्र आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची राज्यातील एकनाथ शिंदे सरकारने गुलाल उधाळायला लावून, प्रत्यक्षात आरक्षण दिलेच नाही, अशी घोर फसवणूक केल्यामुळे आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या जरांगे पाटलांनी अंतरवली सराटीत प्राणांतिक उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून, त्यांची प्रकृती कमालीची खालावत, आज अतिशय चिंताजनक बनली होती. त्यांच्या नाकातून रक्त येण्यास सुरूवात झाली असून, आवाज अतिशय खोल गेला आहे. डॉक्टरांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून, डॉक्टरांचे एक पथक तातडीने अंतरवाली सराटी येथे दाखल झाले. मात्र, जरांगे पाटलांनी उपचार घेण्यास नकार दिल्याने उपोषणस्थळी घबराट पसरली आहे. महिलावर्ग तर अक्षरशः आक्रोश करताना दिसत आहेत. जोपर्यंत राज्य सरकार सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा आणि विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला न्याय देत नाही, तोपर्यंत मी माझे उपोषण माघार घेणार नाही, अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून (इतर मागासप्रवर्ग) आरक्षण देण्यात यावे, या ठळक मागणीसह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी १० फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. मागील ५ दिवसांत त्यांनी अन्न, पाणी घेण्यास नकार दिल्याने त्यांची प्रकृती प्रचंड खालावली असून, त्यांना धड उठूनही बसता येत नाही. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असून, त्यांना बोलताही येत नाही. अनेकांनी विनंती करूनदेखील पाणी घेण्यासही त्यांनी नकार दिला आहे. काल, त्यांचे हात थरथरत होते, बोलण्यासदेखील त्रास होत आहे. त्यामुळे त्यांची अशी सर्व परिस्थिती पाहून त्यांच्या सहकार्यांची चिंता वाढली आहे. नाकातून रक्त येणे ही गंभीर बाब असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून, जरांगे पाटील यांनी तातडीने आपले उपोषण मागे घेऊन अन्न तसेच पाणी घ्यावे, अशी मागणी मराठा बांधव करीत आहेत. दरम्यान, आज मराठा समाजाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोशल मीडियावरून महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे या बंदला राज्यातील अनेक भागात चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. समाजाने शांततेत आंदोलन करावे, असे आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केले आहे. जरांगे पाटलांची तब्येत चिंताजनक होताच, त्याचे पडसाद राज्यभरात उमटायला सुरूवात झाली आहे. काल रात्री जालना – जळगाव रोडवर टायर जाळण्यात आले. आज हिंगोलीमध्ये बंद पुकारण्यात आला. लातूर, धाराशीव अशा अनेक ठिकाणी बंद सुरू होता. पिंपरी-चिंचवडमध्ये मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ एक मोठी रॅली निघत असून, मालेगावमध्येही बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुसरीकडे, प्रशासकीय अधिकारीदेखील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी अंतरवली सराटी गावात पोहोचले आहेत. अधिकार्यांकडून जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, जरांगे यांनी कुठलीही तडजोड नाही, आधी मागण्या पूर्ण करा अन् मगच माझ्याकडे या, अशी भूमिका घेतली आहे.
मी मेलो तर सरकार राहील का, जरांगे पाटलांनी ठणकावले!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाची फसवणूक करीत असल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केला आहे. १५ तारखेचे अधिवेशन २० तारखेपर्यंत पुढे का ढकलले, असा सवाल करून जरांगे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. त्यांची समजूत घालण्यास आलेल्या अधिकार्यांना त्यांना इथून निघून जाण्याचे सांगितले. शिंदे-फडणवीस मराठ्यांची फसवणूक करू लागले आहेत. उद्याच्या उद्या सगेसोयरे असा शब्द असलेला आरक्षणाचा कायदा करावा, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. माझा जीव गेल्यावर सरकार राहिल का? महाराष्ट्र राहिल का? असे म्हणत महाराष्ट्राची श्रीलंका होईल, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनांनी बंदची हाक दिली आहे. आज जालना, बीड, सोलापूर, आळंदी आणि नाशिकमधील अनेक गावांमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. अनेक गावांत सकाळपासून सर्व दुकाने बंद, केवळ दूध आणि अत्यावश्यक सेवा सुरु आहे. सरकारने दिलेला शब्द पाळत आरक्षणाची अंमलबजावणी करावी, मराठा बांधवाची भूमिका आहे.
‘मराठे काय ते तुम्ही १५, १६ तारखेनंतर बघा’
शिंदे, फडवणीस आणि पवार काय सरकार चालवत आहेत? सग्यासोयर्याची अंमलबजावणी, हैदराबाद गॅझेट आणि शिंदे समितीला एक वर्ष मुदतवाढ देत असाल तर इकडे यायचे. तुम्ही १५, १६ तारखेनंतर मज्या बघा. दोन दिवसांत अधिवेशन घेणार होते. घेतलं का? डबल रोल करू नका. मराठे काय आहेत ते तुम्ही १५, १६ तारखेनंतर बघा, असा इशारा जरांगे पाटलांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सरकारला दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव!, उपोषणाचा पाचवा दिवस मात्र उपचार घेण्यास नकार !#loksatta #maharashtra #manojjarangepatil #maratha pic.twitter.com/KJfCJpVDHn
— LoksattaLive (@LoksattaLive) February 14, 2024