बुलढाणा जिल्हा काँग्रेसला धक्का नाही; सर्व खा. मुकूल वासनिकांच्या नेतृत्वात एकसंघ!
– शाहू, फुले, आंबेडकर विचाराने भारावलेली जिल्हा काँग्रेस एकसंघ!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपच्या दबावात येवून काँग्रेस पक्षाचा हात सोड़ला आहे. असे असले तरी खा. मुकूल वासनिक यांच्या नेतृत्वाखाली व शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने भारावलेली जिल्हा काँग्रेस मात्र एकसंघ असल्याचा दावा अखिल भारतीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केला आहे.
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री, जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी १२ फेब्रुवारीरोजी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता, तसेच आज त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे या घटनेचा जिल्हा काँग्रेसवर काही परिणाम होतो का? याबाबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांना छेडले असता त्यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी सविस्तर संवाद साधला. राहुल बोंद्रे म्हणाले, की अशोक चव्हाण हे दुर्देवाने भाजपच्या दबावाचे बळी ठरले आहेत. असे असले तरी जिल्ह्यातील काँग्रेस एकसंघ असून, त्यांचा पक्ष सोड़ण्याचा जिल्हा काँग्रेसवर काहीही परिणाम होणार नाही. १९७८ मध्ये अशीच काँग्रेस पक्षाची वाताहत झाली होती, पण पुन्हा जोमाने पक्ष निवडून आला होता. नेते गेले असले तरी जनता मात्र काँग्रेससोबत असल्याने आगामी निवड़णुकीत काँग्रेस नक्कीच उभारी घेईल, असा ठाम विश्वासही राहुल बोंद्रे यांनी व्यक्त केला. दरम्यान, खामगावचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा हे अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपात जाणार, अशी एक चर्चा कानावर येत होती. यासंदर्भात त्यांच्या निकटवर्तीयांशी संपर्क साधला असता, ही शक्यता त्यांनी फेटाळून लावली. सानंदा हे काँग्रेसमध्येच असून, आगामी विधानसभा निवडणूक ते काँग्रेसकडून लढतील, आणि मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील, असा दावाही त्यांच्या निकतवर्तीयांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना ठामपणे केलेला आहे.
‘तळ्यात-मळ्यातील’ अफवांचे राहुल बोंद्रेही ठरले होते बळी?
गेल्या विधानसभा निवड़णुकीत चिखली मतदारसंघातून राहुल बोंद्रे शिवसेना, भाजपाकड़ून निवड़णूक लढणार अशा वावड्या उठल्या होत्या, तर तशा बातम्याही समाजमाध्यमावर आल्या होत्या. त्याचा फटका बसल्याने राहुल बोंद्रे यांचा पराभव होऊन त्याची हॅटट्रीक हुकली होती. तर राजकारणात अगदीच नवख्या असलेल्या श्वेताताई विद्याधर महाले पाटील या भाजपच्या चिन्हावर निवड़ून आल्या होत्या. आता आगामी विधानसभा निवडणुकीत मात्र राहुल बोंद्रे यांना चांगले वातावरण असून, मागीलवेळी त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा फटका बसून, त्यांचा पराभव झाला होता. यावेळेस वंचित आघाडी ही महाविकास आघाडी सोबत असल्याने राहुल बोंद्रे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. ‘ब्रेक के बाद..’ म्हणून राहुल बोंद्रे हे चिखली विधानसभा निवडणुकीतून पुन्हा एकदा हॅटट्रीक साध्य करण्यास सज्ज झाले असून, त्याचा करिष्मा चिखली बाजार समितीच्या निवडणुकीत दिसून आलेला आहे.
————