Breaking newsHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsWorld update

अशोकरावांच्या हाती अखेर ‘कमळ’!

– देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजप प्रवेश
– काँग्रेस नेत्यांची शरद पवारांसोबत बैठक, पुढील रणनीती ठरवली
– चव्हाणांसोबत काँग्रेसचा कुणीही नेता, आमदार जाणार नाहीत – राज्य प्रभारी चेन्निथला

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी अखेर भारतीय जनता पक्षात अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. गेल्या ३८ वर्षांचा प्रवास बदलून नवा मार्ग स्वीकारला आहे. नरेंद्र मोदींकडून प्रेरणा घेऊन देशाच्या आणि राज्याच्या विकासात योगदान देता यावे यासाठी हा निर्णय घेतला आहे, असे चव्हाण या प्रवेशप्रसंगी म्हणाले. भाजपनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत अशोकराव चव्हाण यांनी आज (दि.१३) दुपारी सहकारी अमर राजूरकर यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला. यापुढे मी भाजपच्या ध्येयधोरणांनुसार काम करेल. विशेषतः पक्षाचा आदेश व फडणवीस यांचे निर्देश यांच्यानुसार मी वाटचाल करेन, असे ते म्हणालेत. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली तरी त्यांच्यासोबत कोणताही आमदार, नेता, काँग्रेस सोडून जाणार नाही, असा विश्वास महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी व्यक्त केला. ते मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत होते.

माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते अशोकराव चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मंगळवारी त्यांनी मुंबईस्थित भाजप कार्यालयात जाऊन केंद्रातील सत्ताधारी भगव्या पक्षात प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. चव्हाण यांच्यासोबत त्यांचे सहकारी अमर राजूरकर यांनीही भाजपत प्रवेश केला आहे. या दोघांव्यतिरिक्त अन्य कुणीही भाजपचे कमळ हाती घेतले नाही. पण येत्या काही दिवसांत चव्हाण यांचे अनेक समर्थक भाजपत प्रवेश करतील, असा दावा केला जात आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर काँग्रेस नेत्यांनी चव्हाण यांच्यावर तिखट टीका केली.

अशोक चव्हाण यांना काँग्रेस पक्षाने काय नाही दिले? नेता ते मुख्यमंत्रीपदापर्यंत सर्व काही दिले आहे. पण त्यांनी अचानक पक्षाला का सोडले याचे कारण तर त्यांनी सांगितले पाहिजे ना, आयाराम-गयाराम करणार्‍यांना जनता किंमत देत नाही, भाजप म्हणजे आता वॉशिंग मशीन झाली आहे, अशी टीका राज्याचे काँग्रेस प्रभारी रमेश चेनिथल्ला यांनी केली आहे. दुसरीकडे, काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनिथल्ला यांच्यासह राज्यातील प्रमुख काँग्रेसच्या नेत्यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या या भेटीदरम्यान आगामी काळात होणार्‍या राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीसंदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अन् हशा पिकला…

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी पहिल्याच पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण बोलताना अडखळल्याचे दिसून आले. सवयीप्रमाणे अशोक चव्हाण यांनी अनवधानाने काँग्रेस असा उल्लेख केला. आशीष शेलार यांचा उल्लेख करताना मुंबई भाजप अध्यक्षऐवजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असे म्हटले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी चूक दुरुस्त करत मुंबई भाजप अध्यक्ष असे म्हटले आणि सभागृहात एकच हशा पिकला.


अनेक नेते आमच्या संपर्कात – देवेंद्र फडणवीस

आम्ही टार्गेट घेऊन चालत नाही. जे नेते योग्य वाटतात त्यांच्याशी आमची चर्चा आहे. हे खरे आहे काही नेते आमच्या संपर्कात आहेत. जमिनीशी जोडलेल्या नेत्याशी आमचा संपर्क सुरू आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. अशोक चव्हाण दोनवेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले. त्यांचा रोल काय असेल, याबाबत केंद्र सरकारसोबत बोलून निर्णय घेतला जाईल, असेही फडणवीस म्हणाले.


मोदींकडून घोटाळ्यांचा उल्लेख, अन् नेते सरळ भाजपात

काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारने काँग्रेसच्या सत्ताकाळात झालेल्या घोटाळ्यांबद्दल एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. त्यातील २४ व्या पानावर आदर्श घोटाळ्याचा उल्लेख होता. या घोटाळ्यावरुन भाजपने काँग्रेसला धारेवर धरले होते. त्यावेळी भाजप विरोधी पक्षात होता. आदर्श घोटाळा प्रकरणात झालेल्या आरोपांनंतर त्यांनी राजीनामा दिला होता. आता भाजपची सत्ता असताना, मोदी सरकारने भ्रष्टाचार प्रकरणांवरुन श्वेतपत्रिका काढलेली असताना चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पंतप्रधान मोदींनी गेल्या वर्षी जून महिन्याच्या अखेरीस एका सभेत सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर अवघ्या १०० तासांत अजित पवारांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह भाजप- शिंदे गटाच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप केले होते. पण आता हीच मंडळी सत्तेत असून अनेकांना मंत्रिपदे देण्यात आली आहेत. फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. आता हेच नेते फडणवीसांसोबत एकाच मंत्रिमंडळात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!