BULDHANAHead linesVidharbha

रविकांत तुपकरांचा गुरूवारी बुलढाण्यात निर्धार मेळावा!

– लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता; राजकीय धुरिणांचे कान टवकारले!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता गर्दे सभागृहात निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर याच दिवशी रविकांत तुपकर यांच्या जामीनावरचा निकालदेखील जिल्हा सत्र न्यायालयात घोषित केला जाणार आहे. एकीकडे न्यायालयाच्या निकालाची उत्सुकता लागून आहे तर दुसरीकडे या निर्धार मेळाव्यात रविकांत तुपकर काय घोषणा करतात याकडेदेखील सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारीला नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी विविध आंदोलने करूनही सरकार केवळ फसवी आश्वासने देत असल्याने, रविकांत तुपकर यांनी रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु रेल्वेरॊकॊ आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी रविकांत तुपकरांना अटक केली होती. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५१ (३) अन्वये १८-०१-२०२४ रोजी तुपकरांना अटक करून १९-०१-२०२४ रोजी न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी बुलढाणा यांचे समक्ष हजर करून १४ दिवस स्थानबद्ध ठेवण्यास विनंती केली होती. मात्र न्यायालयाने उभय पक्षांचे युक्तिवाद ऐकून पोलिसांची विनंती फेटाळून लावली व तुपकर यांची मुक्तता केली होती. त्या आदेशांविरोधात पोलीस स्टेशन बुलढाणा शहर यांनी सत्र न्यायालय बुलढाणा येथे पुर्ननिरीक्षण अर्ज दाखल केला आहे. यामध्ये त्यांना बाकी आंदोलनातील गुन्ह्यांमध्ये मिळालेला जामीन रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी ०७ फेब्रुवारी रॊजी पहिली सुनावणी झाली तर ०८ फेब्रुवारी रॊजी दुसरी सुनावणी झाली. रविकांत तुपकर हे स्वतः न्यायालयासमोर हजर झाले होते तर त्यांच्यावतीने त्यांच्या सुविज्ञ पत्नी ॲड. शर्वरी सावजी-तुपकर यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली. या संपूर्ण प्रकरणात दोन तास जोरदार युक्तिवाद झाला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. या प्रकरणाचा अंतिम निकाल १५ फेब्रुवारी रोजी येणार आहे.
या प्रकरणाचा निकाल काहीही येऊ शकतो म्हणजे रविकांत तुपकर यांचा जामीन रद्द होऊन त्यांना तुरुंगात जावे लागू शकते किंवा मग त्यांची मुक्ततादेखील होऊ शकते. परंतु या निकालापूर्वी रविकांत तुपकर हे आपल्या समर्थकांशी संवाद साधणार आहेत. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता गर्दे सभागृहात बुथ प्रमुखांच्या निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. काहीही झाले तरी यावेळी लोकसभा निवडणूक लढवायचीच असा निर्धार आता कार्यकर्त्यांनी केला आहे. या मेळाव्यात लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासंदर्भात रविकांत तुपकर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे रविकांत तुपकर या मेळाव्यात काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत. तर दुसरीकडे न्यायालयाचा निकाल काय लागतो याबाबतदेखील कमालीची उत्सुकता लागून आहे. त्यामुळे 15 फेब्रुवारी हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार असून या दिवसाकडे सर्वांची नजर आहे. तर या निर्धार मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रविकांत तुपकर यांच्या पत्नी ॲड. शर्वरी तुपकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!