बुलढाणा (राजेंद्र काळे) – ज्या गावाने अजून एसटी सुद्धा बघितली नाही, त्या गावच्या सरपंचाला विमानातून प्रवास करण्याचा योग आला तो.. तेलंगणा अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने!
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात मध्यप्रदेश सीमेवर वसलेले भिंगारा हे अतिदुर्गम गाव, या गावात अजूनही एसटी जात नाही. कोणत्याही वाहनाला जायला धड रस्ता नाही. गाव आदिवासी बहुल असल्यामुळे ते विकासापासून कोसो दूर. पण या गावचे युवा आदिवासी सरपंच राजेश आवासे यांची तेलंगाना येथे अभ्यास दौऱ्यासाठी निवड बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत निवड झाली, अन् ते आज ९ फेब्रुवारी रोजी नागपूर विमानतळावरून हैदराबाद येथे राज्यस्तरीय अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले.
बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत संजय इंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा स्वच्छता भारसाकले, मोताळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी समाधान वाघ, विस्तार अधिकारी अशोक काळे, शेलगाव बाजारच्या सरपंच सरला अमित खर्चे व पांगरखेड येथील सरपंच सुधाकर धनद्रे, सचिव सागर काळे, खामगाव पंचायत समितीच्या ग्रामसेविका पाडळे आदी तेलंगाना राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदचा अभ्यास करून राबविण्यात येणाऱ्या योजना समजावून घेऊन आपल्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने विकास कामे करता येतील, याचा अभ्यास करणार आहेत.