Breaking newsHead linesMaharashtraPolitical NewsPolitics

‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’; ज्येष्ठ नेते पवारांच्या पक्षाचे नवे नाव!

– शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाणार, अजित पवार गटाकडूनही कॅव्हेट दाखल

नवी दिल्ली (खास प्रतिनिधी) – केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी धक्का देत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे पक्षनाव व घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार गटाला दिल्याने पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांना जोरदार धक्का बसलेला आहे. या निर्णयाविरोधात ते सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षाचे नाव पाठविण्याची सूचना निवडणूक आयोगाने शरद पवारांना केली होती. त्यानुसार, पाठवलेल्या तीनपैकी “नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार” हे नाव आता शरद पवार यांच्या गटाला मिळाले असून, पक्षचिन्ह अद्याप देण्यात आलेले नव्हते. जे शिवसेनेसोबत झाले तेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत झालेले आहे. ‘केंद्रातील अदृश्य शक्ती’ने आमचा पक्ष ओरबाडून नेला आहे. या सत्तांध लोकांना जनताच धडा शिकवेल, असा संताप पक्षाच्या अध्यक्षा खा.सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलेला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने काल (दि.६) महाराष्ट्र सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व चिन्ह बहाल करण्याचा निर्णय दिला होता. तब्बल सहा महिने चाललेल्या व दहा सुनावण्यानंतर आयोगाने आपला निकाल देत, शरद पवार गटाला जोरदार धक्का दिला होता. त्यानंतर आज (दि.७) सायंकाळी चार वाजेपर्यंत पक्षासाठी नवे नाव सूचविण्याचे सांगितले होते. त्यानुसार, शरद पवार गटाने नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार आणि एनसीपी-शरद पवार अशी तीन नावे कळवली होती. त्यानुसार, आयोगाने शरद पवार गटासाठी “नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार” असे नाव घोषित केले आहे.

दरम्यान, आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने कालच सर्वोच्च न्यायालयात जाण्याची घोषणा केली होती. परंतु, त्यांच्या अगोदर अजित पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, अ‍ॅड. अभिकल्प प्रताप सिंह यांच्यामार्फत कॅव्हेट (हस्तक्षेप याचिका) दाखल केली आहे. आमचे म्हणणे ऐकल्याशिवाय निर्णय देऊ नये, अशी विनंती केली आहे. दरम्यान, आमच्याकडे ५० पेक्षा जास्त आमदार, जिल्हाध्यक्ष आहेत. लोकशाहीत बहुमताला महत्व असते. त्यामुळेच आम्हाला पक्षाचे चिन्ह व नाव मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या केंद्रीय निवडणूक आयोगातील निर्णयाचा काय निकाल लागतो, याकडे महायुतीतील तीनही पक्षांचे लक्ष लागून होते. त्यामुळेच या तीन पक्षांचे आगामी लोकसभा निवडणुकीत जागावाटप रखडले होते. राज्यसभेच्या निवडणुकीसाठीही त्यांचे जागावाटप थांबले होते. आता हे जागावाटप तातडीने मार्गी लागेल, असे वरिष्ठस्तरीय सूत्राने सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अजित पवार यांना मिळाल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस आता अधिकृतरित्या भाजपसोबत गेलेली आहे. तसेच, ते महायुतीचे घटक बनले आहेत.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!