BuldanaBULDHANAChikhaliPuneVidharbha

राज्यातील शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा १२ फेब्रुवारीला पुणे शिक्षण संचालक व शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा!

– बुलढाणा जिल्हा अध्यक्ष राजेंद्र घुबे यांनी दिली माहिती, मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन

चिखली (महेंद्र हिवाळे) – शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात शिक्षणमंत्री यांनी उपस्थित राहून शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे प्रलंबित प्रश्न आठ दिवसात सोडवू, असे आश्वासन दिले होते. मात्र त्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ यांचे अध्यक्ष अनिल माने, सरकार्यवाह शिवाजी खांडेकर, कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर यांच्या नेवृत्वाखाली सोमवार (दि.१२ फेब्रुवारी) रोजी पुणे येथे शनिवारवाडा ते शिक्षण संचालक व शिक्षणायुक्त कार्यालय सेंट्रल बिल्डिंग पुणे अशा मोर्चा काढला जाणार आहे. तर मागन्या मान्य न झाल्यास २० फेब्रुवारीपासून राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी कामबंद आंदोलन करण्यार असल्याचे संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष राजेंद्र घुबे यांनी सांगितले आहे.

दि. ७ जानेवारी रोजी सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य शिक्षकेत्तर संघटना महामंडळाच्यावतीने एक दिवसीय अधिवेशन व चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.सदर अधिवेशनात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थित राहून शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे प्रलंबित प्रश्न त्वरीत सोडवू, असे आश्वासन दिले होते. मात्र त्याआश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्यावतीने मोर्चा काढणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यासह संबंधित विभागांना देण्यात आले आहे, या निवेदनात म्हटले आहे, की ७ जानेवारी रोजी झालेल्या शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या अधिवेशनात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थित राहून शिक्षकेतर कर्मचारी यांना इतर शासकीय कर्मचार्‍यांना लागू केलेल्या १०/ २०/ ३० च्या लाभाची योजना त्वरित मंजूर करावी, आकृतीबंध संदर्भात नियुक्त केलेल्या समितीने सादर केलेला अहवाल मंजूर करून शिक्षकेतरांच्या भरतीस त्वरित परवानगी मिळावी, शिक्षकेतरांना १२ वर्षे व २४ वर्षानंतर पहिला व दुसरा लाभ तत्काळ लागू करण्यात यावा, सेवेत असल्यास आपली शैक्षणिक पात्रता वाढविल्यास त्या सर्व प्रकारच्या पदावर वेतन संरक्षणासह विनाअट संवर्ग बदलून मिळावा व पवित्र प्रणालीमधून वगळण्यात यावे, पदवीधारक ग्रंथपालांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी, विद्यार्थी संख्या कमी झाल्यास शिक्षकेतरांना वेतन व वेतन श्रेणी संरक्षण मिळावे, विनाअनुदानित तुकडीवरील विद्यार्थी संख्या शिक्षकेतर पदे मंजूर करताना ग्राह्य धरावे, यासह आदी प्रलंबित प्रश्न त्वरीत निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. परंतु याबाबत शासनाकडून कोणतीही सकारात्मक हालचाल होताना दिसून येत नाही, किंबहुना संघटनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यां सोबत चर्चा करून काय वस्तुस्थिती आहे हे देखील सांगण्यात येत नाही. त्यामुळे नाविलाजास्तव सोमवार, दि.१२ फेब्रुवारीरोजी पुणे येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, व त्यादिवशी कर्मचारी यांच्या मागण्या मान्य न झाल्यास पुढील दि. २० फेब्रुवारीपासून राज्यभरात कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
पुणे येथे होणार्‍या मोर्चासाठी राज्यासह जिल्ह्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बुलढाणा जिल्हा अध्यक्ष राजेंद्र घुबे, उपाध्यक्ष रेखा खरे, शैलेंद्र महाजन, जिल्हा सचिव शिवाजी बाहेकर, कार्याध्यक्ष सतीष कुळकर्णी, विनायक भालेराव, बसवेश्वर आखाडे, रामेश्वर मोरे, मो.रिजवान मो.जाफर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!