चिखली (तालुका प्रतिनिधी) – चिखली तालुक्याचे नवे तहसीलदार म्हणून संतोष काकडे यांनी आज (दि.5) पदभार स्वीकारला आहे. काकडे हे यापूर्वी मेहकर येथेदेखील तहसीलदार राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना बुलढाणा जिल्ह्याची चांगलीच माहिती व अभ्यास आहे. येथे येण्यापूर्वी ते अमरावती येथे तहसीलदार व नंतर विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यरत होते. त्यांच्या बनावट सहीने होणारा कोट्यवधी रूपयांचा जमीन घोटाळा त्यांनी उघडकीस आणल्याने ते अमरावती येथे चांगलेच गाजले होते. तसेच, अनेक गौण खनिज तस्करांवर त्यांनी कठोर कारवाईदेखील केलेली आहे. चिखली तालुक्यातील वाळूतस्करी रोखण्याचे मोठे आव्हान आता त्यांच्यासमोर आहे.
चिखली तहसील कार्यालयाचे रुपडे पालटून हे शासकीय कार्यालय आनंददायी व लोकाभिमुख करणारे लोकप्रिय तहसीलदार सुरेश कव्हळे यांची राज्य सरकारने आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अकोला येथे बदली केली आहे. कव्हळे यांच्यामुळे चिखली तहसीलला ‘आयएसओ’ नामांकनदेखील प्राप्त झालेले आहे. तहसील कार्यालयाचा हा लोकाभिमुख कारभार नवे तहसीलदार काकडे यांनी पुढे नेणे अपेक्षित आहे. शिवाय, वाळू व गौण खनिज तस्करी, आगामी लोकसभा निवडणूक, महसूलचे विविध प्रश्न आदी त्यांच्यासमोर आव्हाने आहेत, ही आव्हाने ते कशी पेलतात, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागून आहे.
श्रीनगर ते कन्याकुमारी हा टप्पा सायकलींगद्वारे पार करण्याचा विक्रमदेखील तहसीलदार संतोष काकडे यांच्या नावावर जमा आहे. 2023च्या मार्चमध्ये राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी व शांततेचा संदेश घेऊन हा प्रवास त्यांनी केला होता. फक्त सहा दिवस आणि 13 तासांत काकडे यांच्यासह चौघांनी 3 हजार 651 किलोमीटरचे अंतर सायकलींगद्वारे पार केले होते.