राज्यातील १७ सनदी अधिकार्यांच्या बदल्या; बुलढाणा झेडपीच्या सीईओ भाग्यश्री विसपुते यांचीही बदली!
बुलढाणा/कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी) – बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) भाग्यश्री विसपुते यांच्यासह राज्यातील एकूण १७ सनदी अधिकार्यांच्या राज्य सरकारने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर बदल्या केल्या आहेत. विसपुते यांचा बुलढाण्यातील कार्यकाळ चांगलाच गाजलेला आहे. या बदल्यांत काही अधिकार्यांची सोयीने उचलबांगडी करण्यात आल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. तर वादग्रस्त भूमिकेमुळे चर्चेत राहिलेले कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचीही शासनाने बदली केली आहे. अनेक अधिकार्यांना साईड पोस्टिंग मिळाल्याने ते नाराज असल्याचे समजते.
राहुल रेखावार कोल्हापूर जिल्हाधिकारी असताना, तसेच भाग्यश्री विसपुते या बुलढाणा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना अनेकवेळा चर्चेत राहिले. अंबाबाई मंदिरात पत्रकारांना प्रवेश रोखणे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिवांकडून तत्काळ पदभार काढून घेणे आदी मुद्यांवरून रेखावार यांची कारकीर्द गाजली होती. तर शिक्षण विभागाविरोधात शिक्षक मागणीसाठी जिल्हा परिषदेत आंदोलन करणार्या पालकांविरोधात गुन्हे दाखल झाल्याने भाग्यश्री विसपुते या चर्चेत आल्या होत्या. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने या प्रकरणात सडेतोड भूमिका घेतल्याने, व जनमत संतप्त झाल्याने हे गुन्हे नंतर मागे घ्यावे लागले होते.
श्रीमती भाग्यश्री विसपुते यांनी २० ऑक्टोबर २०२० रोजी येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार घेतला होता. दरम्यान, गेल्या सात ते आठ महिन्यापूर्वी त्यांची बदलीदेखील करण्यात आली होती. परंतु प्रकृती अस्वस्थच्या कारणामुळे त्यांना कार्यकाळ वाढवून दिला असल्याची माहिती आहे. श्रीमती भाग्यश्री विसपुते यांचे दोनाचे चार हातदेखील येथेच झाल्याने त्या बुलढाण्याची आठवण कधीच विसरू शकणार नाही. कड़क प्रशासनासह विविध कारणांमुळे त्यांचा प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यकाळदेखील चांगलाच चर्चेत राहिला आहे. त्यांच्या बदलीने येथील रिक्त पदावर मात्र अद्याप कुणाचीही नियुक्ती करण्यात आली नाही.
– १७ सनदी अधिकार्यांच्या बदल्या –
१. नितीन पाटील विशेष आयुक्त, वस्तू आणि सेवा कर, महाराष्ट्र, मुंबई यांची सचिव, राज्य मानवाधिकार आयोग, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२. अभय महाजन सचिव, दिव्यांग कल्याण विभाग यांची विशेष आयुक्त, वस्तू आणि सेवा कर, महाराष्ट्र, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
३. संजय एल. यादव सह व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी, मुंबई यांची जिल्हाधिकारी, मुंबई शहर, नियुक्ती करण्यात आली आहे.
४. राहुल रेखावार, जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांची महा. राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
५. राजेंद्र क्षीरसागर जिल्हाधिकारी, मुंबई शहर, मुंबई यांची जिल्हाधिकारी, मुंबई उपनगरी जिल्हा, नियुक्ती करण्यात आली आहे.
६. अमोल येडगे, संचालक, महा राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, पुणे यांना जिल्हाधिकारी, कोल्हापूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
७. मनुज जिंदाल मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे यांची सहव्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
८. भाग्यश्री विसपुते मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा यांची नियुक्ती मुख्य प्रशासक (नवीन टाउनशिप), सिडको, छत्रपट्टी संभाजी नगर येथे बदली करण्यात आली आहे.
९. अवश्यंत पांडा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती यांची आयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१०. वैभव वाघमारे प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, अहेरी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, अहेरी उपविभाग, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
११. संजीता महापात्रा प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, डहाणू आणि सहायक जिल्हाधिकारी, डहाणू उपविभाग, पालघर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१२. मंदार पत्की प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, तळोदा आणि सहायक जिल्हाधिकारी, तळोदा उपविभाग, नंदुरबार यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
१३. मकरंद देशमुख सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय, मंत्रालय, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१४. नतिशा माथूर संवर्ग गुजरातला महाराष्ट्रात बदलून प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, तळोदा आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, तळोदा उपविभाग, नंदुरबार म्हणून नियुक्त केले आहे.
१५. मानसी सहायक जिल्हाधिकारी, बल्लारपूर उपविभाग, चंद्रपूर यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, देसाईगंज उपविभाग, गडचिरोली येथे बदली करण्यात आली आहे.
१६. पुलकित सिंह सहाय्यक जिल्हाधिकारी, चांदवड उपविभाग, नाशिक यांची प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, कळवण आणि सहायक जिल्हाधिकारी, कळवण उपविभाग, नाशिक येथे बदली करण्यात आली आहे.
१७. करिश्मा नायर सहाय्यक जिल्हाधिकारी, बीड उपविभाग, बीड यांची प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, जव्हार आणि सहायक जिल्हाधिकारी, जव्हार उपविभाग, पालघर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शिंदे फडणवीस सरकारच्या वतीने आज राज्यातील 17 IAS अधिकाऱ्यांच्या व पोलिस अधीक्षक, पोलिस उपायुक्तांसह पोलिस आयुक्तांच्या मिळून अशा 42 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात प्रामुख्याने नागपूर पोलिस आयुक्तालयाचे आयुक्त अमितेश कुमार यांची पुणे पोलिस आयुक्तपदी बदली झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या या बदल्या महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.