बचत गटांना शेळी व बोकड वाटप कार्यक्रमात कोट्यवधीचा घोळ!
– संग्रामपूर, जळगाव जामोद, मेहकर, लोणार, चिखली, देऊळगावराजा तालुक्यांत मोठा घोळ; आंदोलनाचा इशारा
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – मानव विकास मिशन अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे १५१ बचत गटांना शेळी व बोकड वाटप कार्यक्रम राबविला जात आहे. परंतु या कार्यक्रमात प्रचंड गैरव्यवहार केला जात असून, लाभार्थ्यांना अत्यंत कमी वजनाच्या व रोड शेळी आणि बोकड देऊन लाभार्थ्यांची फसवणूक केली जात आहे. काही लोकप्रतिनिधींच्या नावाखाली व अधिकाऱ्यांच्या संगनमताने चार ते पाच कोटी रुपयांचा हा अपहार केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले असून, आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, मानव विकास मिशन अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील सहा तालुक्यामधील एकूण १५१ बचत गटांना अंदाजे ७ कोटी ६१ लाख रुपये निधी उपलब्ध झालेला आहे. सदर निधी संग्रामपूर, जळगाव जामोद, मेहकर, लोणार, चिखली, देऊळगावराजा या सहा तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी उपलब्ध झाला आहे. हा निधी शासनाच्या नियमानुसार मानव विकास मिशन अंतर्गत ग्रामीण विकास यंत्रणेला प्राप्त झालेला आहे. त्यांनी या महिला बचत गटांसाठी शासन अधिकृत महामंडळ अहिल्यादेवी होळकर विकास महामंडळ विभाग, पडेगांव येथे रितसर पत्रव्यवहार व कार्यवाही करुन सदर माल लाभार्थ्यांना खरेदी करुन देण्याबाबत कार्यवाही करायला पाहिजे होती. परंतु असे न करता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने सदर निधी हा परस्पर लाभार्थ्यांच्या खात्यात वळती केलेला आहे. सदर निधी लाभार्थ्यांच्या खात्यात वळती केल्यानंतर लाभार्थ्यांनी शासनाच्या ध्येय धोरणानुसार व नियमानुसार सदर निधीमध्ये मंजुर प्रस्तावानुसार ३० शेळ्या प्रत्येकी ३५ किलो व ३ बोकड प्रत्येकी ४५ किलो असे एकूण ३३ नग त्यांच्या पसंतीने व मर्जीने खुल्या बाजारातून खरेदी करुन व ३ वर्षाचा इन्शुरन्स व डॉक्टरांचे सोलनेस (फिटनेस) सर्टिफिकेट काढून ग्रामीण विकास यंत्रणेकडे दाखल करावे, अशी सर्व तरतुद आहे. याउलट खातेदारांच्या खात्यात पैसे टाकल्यानंतर ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे व त्यांच्या काही अधिकाऱ्यांद्वारे प्रकल्प संचालक तसेच उमेद जिल्हा मिशन मॅनेजर (District Mission Manager) तसेच ब्लॉक मॅनेजर (Block Manager) यांनी बेकायदेशिररित्या ठेकेदार म्हणून पुरवठादाराची नेमणूक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. १२,००० किमतीची एक शेळी व १४,००० किंमतीचा एक बोकड असे खरेदी किंमत असतांना सदर लाभार्थ्यांना ठेकेदाराकडून फक्त ६,००० रु. किमतीची शेळी व अत्यंत निकृष्ट दर्जाची व बिमार असलेली व परप्रांताची अशी शेळी दबाव तंत्राने देण्याचा प्रयत्न करीत आहे. अशी घटना मेहकर तालुक्यातील जानेफळ गुरांच्या दवाखान्यात व वडाळी गावात लाभार्थ्यांसोबत दि. २५-०१-२०२४ रोजी घडली आहे. अशा स्थितीत लाभार्थ्यांनी सदर माल घेण्यास नकार दिला व माल शासनाच्या ध्येय धोरणानुसार व मुल्यांकनानुसार वजनाने देण्यात यावा व चांगल्या प्रकारचा माल देण्यात यावा, अशी मागणी केली. असे न केल्यास आम्ही खुल्या बाजारातून आमच्या पसंतीने माल घेवून तुम्हास अहवाल सादर करु, असे बचत गटांनी ब्लॉक मॅनेजर यांना सांगितले. परंतु ब्लॉक मॅनेजर यांनी त्यांची ही रास्त मागणी न ऐकता त्यांना सदर पुरवठादाराकडून माल घेण्यास बाध्य करण्याचा प्रयत्न केला. ही बाब अत्यंत गंभीर असून पूर्णपणे बेकायदेशीर व लाभार्थ्यांची लूट करण्याचा प्रयत्न आहे.
सदर लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या रकमेत ३० शेळी प्रत्येकी ३५ किलो एकूण १०५० किलो शेळी व ३ बोकड प्रत्येकी ४५ किलो एकूण १३५ किलो असा माल घ्यावयाचा आहे. असे असतांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे काही कर्मचारी यांनी ठेकेदाराकडून २० ते २२ किलोची शेळी व २० ते २२ किलोचा बोकड असा माल देण्याचा प्रयत्न करीत आहे व लाभार्थ्यांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सर्व व्यवहारात संबंधीत अधिकारी ७ कोटीच्या मालात फक्त २ ते ३ कोटींचा निकृष्ठ दर्जाचा माल देऊन लाभार्थ्यांची फसवणूक करीत आहे. हा सर्व प्रकार काही लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली व अधिकाऱ्यांच्या संगनमताने होत आहे. त्यामुळे हा प्रकार तातडीने थांबवून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच लाभार्थ्यांना नियमाप्रमाणे प्रत्येकी ३५ किलो शेळी एकूण ३० नग व प्रत्येकी ४५ किलो बोकड एकूण ३ नग असे एकूण प्रत्येक गटाला ३३ नग रितसर डॉक्टरांचा सोलनेस सर्टिफिकेट जोडून व ३ वर्षाचा इन्शुरन्ससह देण्यात यावा, व सदर प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली असून, कारवाई न झाल्यास आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशाराही दिला आहे.