– कापसाला मिळाला ७०२० रूपयांचा हमीभाव
देऊळगावराजा (राजेंद्र डोईफोडे) – परिसरातील कापूस उत्पादक शेतकर्यांच्या कापसाला अपेक्षित भाव मिळावा म्हणून हमीभावाने सीसीआय खरेदी केंद्र मंजूर झाले असून, काल (ता.३०) बाजार समिती यार्डात सभापती समाधान शिंगणे यांच्याहस्ते खरेदीला सुरुवात झाली. यासाठी कॉटन कॉर्पोरेशनकडे माजी मंत्री, आ.डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पाठपुरावा केला होता. बाजार समिती यार्डात कापूस खरेदी उद्घाटनप्रसंगी बायगाव येथील शेतकरी भास्कर आघाव यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. सभापती समाधान भिकाजी शिंगणे यांनी काटा पूजन करून विक्रीसाठी आणलेला कापसाला ७०२० रूपये भाव देण्यात आला. सी.सी.आय.चे ग्रेडर श्री. डहाके यांनी ओलावा तपासून शेतकर्यांची ऑनलाईन नोंदणी केली व त्यानंतर कापूस खरेदीला सुख्यात करण्यात आली.
देऊळगावमहीमध्ये आठवडाभर रविवार वगळता कापूस खरेदी करण्यात येणार आहे. कापूस उत्पादक शेतकर्यांनी हमीभावाने कापूस विक्रीसाठी अद्यावत ७/१२ उतारा त्यामध्ये कापूस पिकाची नोंद असणे आवश्यक असून, आधार कार्ड तसेच मूळ कापूस उत्पादक शेतकरी विक्रीसाठी उपस्थित असणे आवश्यक आहे. कापूस खरेदी खरेदी उद्घाटनासाठी बाजार समितीचे संचालक मंडळ देऊळगावमहीमधील प्रगतशील शेतकरी माजी सरपंच अनंता इंगळे, भारत शिंगणे, श्रीकृष्ण शिंगणे, संजू माऊली शिंगणे, कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव किशोर म्हस्के व कर्मचारीवर्ग उपस्थित होते. शेतकरी बांधवांनी कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणावा, त्यासाठी चांगल्या प्रतीचा कापूस आणावा, भिजलेला कापूस आणू नये, तसेच ऑनलाईन नोंदणीसाठी ७/१२ उतारा त्यामध्ये कापूस पिकाची नोंद, आधारकार्ड सोबत आणावे, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती समाधान भिकाजी शिंगणे व संचालक मंडळाने केले आहे.