चिखली (कैलास आंधळे) – देऊळगावराजा-सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त तरूण-तरूणींना नोकरीच्या संधी, रोजगार प्राप्त व्हावा, यासाठी माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल देऊळगावराजा येथे दिनांक ४ फेब्रुवारीरोजी महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे, या मेळाव्याचा जास्तीत जास्त तरूण-तरूणींनी लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ यांनी केले आहे.
‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना गजानन वायाळ म्हणाले, की आज समाजापुढे प्रामुख्याने असलेल्या प्रश्नांपैकी अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बेरोजगारी आहे. ग्रामीण भागांमध्ये अनेक तरूण विविध विषयांमध्ये पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेऊन बेरोजगार आहेत, अशा सर्व तरुणांसाठी, सर्वसामान्य माणसांसाठी अहोरात्र झटणारे नेतृव आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्वतःच्या खर्चाने ५० विविध प्रकारच्या कंपन्यांचे अधिकारी एकाच ठिकाणी बोलावून महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून, परिसरातील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून ८ वी, १० वी, १२ वी, बीए, बीएसस्सी, बीकॉम, एमकॉम, बीबीए, एमबीए, पॅरा मेडिकल अशा विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या तरुणांसाठी त्यांच्या पात्रतेनुसार जागेवर मुलाखत घेऊन उपलब्ध असलेल्या जागा भरल्या जाणार आहेत. या महारोजगार मेळाव्यामध्ये ज्या तरूण-तरूणींना नोकरी मिळेल त्यांना नोकरीची संधी तर मिळेलच; पण उर्वरित तरूण-तरूणींना जशजशा जागा उपलब्ध होतील, तसतशी नोकरीची संधी मिळणार आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. तरी ह्या संधीचा मेरा बुद्रूक, मेरा खुर्द सर्कलसह तालुक्यातील तरूण-तरूणींनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, व दिनांक ४ फेब्रुवारीरोजी देऊळगावराजा येथे होत असलेल्या महारोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ यांनी केले आहे.
————