देऊळगावराजा (राजेंद्र डोईफोडे) – देऊळगावराजा तालुक्यात मिरचीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. येथील बाजार समितीत मिरचीसाठी मार्केट उपलब्ध नसल्याने रोज शेकडो क्विंटल मिरची दुसरीकडे विक्रीसाठी जाते. यामुळे बाजार समितीचे नुकसान होत असून मिरची उत्पादक शेतकऱ्यांनादेखील मिरची विक्री करण्यास अडचण होत आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये मिरची विक्रीसाठी सर्व सोयीयुक्त मार्केट उपलब्ध करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने निवेदनाद्वारे बाजार समिती प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मिरच्या सोबत घेऊन बाजार समिती प्रशासनाला निवेदन दिले. सदर निवेदनात नमूद आहे की, देऊळगाव राजा तालुक्यात मिरचीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. येथील शेतकरी कपाशी पाठोपाठ मिरचीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेत आहे. जवळपास तालुक्यातील प्रत्येक शेतकरी मिरची पिकाची लागवड करत आहे. मात्र तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत मिरची विक्री करण्यासाठी मार्केट उपलब्ध नसल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीचे ठरत आहे. परिणामी येथील शेतकऱ्यांना मिरची विक्री करण्यासाठी जालना किंवा जाफराबाद येथे जावे लागते. येथून बाहेरगावी मिरची विक्रीस नेण्यासाठी शेतकऱ्यांना वाहतूक खर्च देखील जास्त लागतो. शिवाय, शेतकऱ्यांचा वेळही जातो.
देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत बाजार समिती मध्ये मिरची उत्पादक शेतकऱ्यांना सर्व सोयीयुक्त मार्केट उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. तसेच मिरची उत्पादक शेतकऱ्यांना स्वतःच्या तालुक्यात आपल्या हक्काचे मिरची मार्केट असेल. शेतकऱ्यांना बाहेरगावी मिरची विक्री करण्यासाठी जाण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वाहतूक खर्च कमी लागेल. महत्त्वाचे म्हणजे बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ होईल. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत बाजार समितीमध्ये मिरची विक्रीसाठी मार्केट उपलब्ध करून करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे सरचिटणीस विनायक भानुसे, तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, सचिव जहीर पठाण, आजमत खान, सुरेश कोल्हे, शहर अध्यक्ष विजय खांडेभराड, शंकर वाघमारे, अमोल उदयपूरक, सचिन कोल्हे, संजय लोखंडे, प्रदीप कोल्हे, रावसाहेब गाढवे, परमेश्वर कोल्हे, मुबारक चाऊस, असलम खान, साजिद खान, शे. समीर आदींनी केली आहे.