Head linesMaharashtra

बुलढाणा जिल्ह्यासह २३ जिल्ह्यांत उमेदवारांना ‘अच्छे दिन’!

बुलढाणा (संजय निकाळजे) – ऑगस्ट व सप्टेंबर २०२३ मध्ये तीन टप्प्यात महसूल विभागातील तलाठी सवर्गाची सरळ सेवा पद भरती परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतील उमेदवारांची जिल्हानिहाय निवड व प्रतीक्षा यादी जाहीर झाली असून, बुलढाणा जिल्ह्यासह २३ जिल्ह्यांमध्ये आता तलाठ्यांची नियुक्ती होणार आहेत. त्यामुळे आता या उमेदवारांना नववर्षाच्या सुरुवातीलाच “अच्छे दिन” आले आहेत.

राज्यातील बहुचर्चित तलाठी परीक्षेतील उमेदवारांची २३ जिल्ह्यातील जात वर्गनिहाय गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा उमेदवारांची जिल्हानिहाय (१३ जिल्हे पेसा कायदा लागू असलेल्यांना वगळून) निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार उमेदवारांना कागदपत्राची पडताळणी, वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी आणि अंतिम नियुक्तीची कार्यवाही जिल्हा निवड समितीकडून जिल्हास्तरावर करण्यात येणार आहे. तसेच विशेषता सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित क्षेत्रातील (पेसा कायदा लागू) सतरा सवर्गातील सरळसेवा पदभरतीच्या अनुषंगाने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित १३ जिल्ह्याची निवड यादी करण्याचे काम देखील जिल्हास्तरावर जिल्हा निवड समिती आणि सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात येणार आहे. त्या संदर्भात राज्य सरकारकडून आदेश आल्यानंतर पुढील कार्यवाही होणार असल्याने आदिवासी बहुल जिल्ह्यामधील पद भरतीला विलंब लागणार असल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाच्या अपर जमाबंदी आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षेच्या प्रभारी राज्य समन्वयक सरिता नरके यांचेकडून मिळाली. महसूल विभागातील तलाठी (गट- क) संवर्गाची सरळ सेवा पद भरती परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत तीन टप्प्यात ५७ सत्रांमध्ये घेण्यात आली. या परीक्षेत तलाठी पदासाठी राज्यभरातून दहा लाख ४१ हजार ७१३ परीक्षार्थींनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. परीक्षेची उत्तर सूची प्रकाशित करून उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तर सूची बाबत काही आक्षेप, हरकती असल्यास त्या नोंदवण्यासाठी २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत मुदत देण्यात आली होती.
संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्न पैकी २८३१ प्रश्नावर १६ हजार२०५ आक्षेप उमेदवाराकडून नोंदविण्यात आले होते. या आक्षेपापैकी एकूण वैद्य १४६ प्रश्नासाठी घेतलेले ९ हजार बहात्तर आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून योग्य ठरण्यात आले. त्यानुसार सामान्यीकरण पद्धतीने परीक्षेमध्ये ४८ उमेदवारांना २०० पेक्षा जास्त सामान्यकृत गुण मिळाल्याचे दिसून आले.


जिल्हा न्याय निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर झालेल्या जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, वाशिम, परभणी, बीड लातूर, जालना, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि हिंगोली या जिल्ह्याचा समावेश आहे. जिल्हानिहाय पात्र उमेदवारांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवाराची ओळख, प्रमाणपत्रे, इतर शैक्षणिक स्थानिक कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी, चारित्र पडताळणी, तसेच आरक्षणाप्रमाणे कागदपत्राची पडताळणी जिल्हा निवड समितीच्या पातळीवर करण्यात येणार आहे. असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!