BuldanaBULDHANAChikhaliHead linesVidharbha

बुलढाणा अर्बनच्या शाखा व्यवस्थापकाची मनमानी; तारण सोयाबीनच्या लिलावाच्या बजावल्या नोटिसा!

– हादरलेल्या शेतकर्‍यांची जिल्हा उपनिबंधकांकडे धाव; सावळेंवर कठोर कारवाईची मागणी

अंढेरा (हनिफ शेख) – सोयाबीन पिकाला भाव नसल्याने पीडित शेतकर्‍यांनी आपले सोयाबीन बुलढाणा अर्बनच्या गोदामात ठेवले होते. पैशाची निकड असल्याने काही शेतकर्‍यांनी तारणकर्जदेखील घेतले आहे. सद्याची बिकट आर्थिक परिस्थिती व शेतीपिकांचे झालेले नुकसान पाहाता, तारणकर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांना त्रास दिला जाणार नाही. सोयाबीनला भाव नसल्याने या पिकाचा लिलाव केला जाणार नाही, अशी ग्वाही बुलढाणा अर्बनचे जनरल मॅनेजर कासाट यांनी शेतकर्‍यांना दिली होती. तरीदेखील अंढेरा शाखा व्यवस्थापक अनिल सावळे यांनी मनमानी करून तारणकर्जाचे व्याज भरा, अन्यथा सोयाबीनचा लिलाव करू, अशा नोटिसा शेतकर्‍यांना बजावल्या आहेत. या नोटिसांमुळे शेतकरी हादरले असून, या शेतकर्‍यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. याप्रश्नी जिल्हा उपनिबंधकांनी हस्तक्षेप करून सावळे यांच्यावर बुलढाणा अर्बन व्यवस्थापन व जिल्हा उपनिबंधक यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी हतबल झालेले शेतकरी करत आहेत.

राज्यात गेल्या दोन वर्षांपासून शेतकर्‍यांना अनेक अस्मानी संकटांना सामोरे जावे लागत असल्यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला असताना भरीसभर सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे मागील दोन वर्षांपासून कोणत्याच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेला आहे. शेतात राबराब राबून रक्ताचे पाणी करत सोयाबीन, कापूस पिकाचे उत्पादन घेतले. परंतु, या पिकांना भाव नसल्याने अनेक शेतकर्‍यांचे सोयाबीन हे ठीकठिकाणच्या बुलढाणा अर्बनच्या वेअर हाऊसला पडलेले आहे. असे असताना काही शेतकरी यांनी त्या मालावर तारण कर्ज घेतलेले आहे. परंतु, या तारण घेतलेल्या कर्जावरील व्याज भरण्यासाठी अंढेरा येथील बुलढाणा अर्बनचे शाखा व्यवस्थापक अनिल सावळे यांनी संबंधित शेतकर्‍यांना तगादा लावल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. तात्काळ व्याज भरा अन्यथा, तुमच्या मालाचा लिलाव करण्यात येईल, अशा नोटिसा कर्जबाजारी शेतकर्‍यांना बजावल्याने मोठ्या संख्येने शेतकर्‍यांचे धाबे दणाणले आहे.
एकीकडे सोयाबीनला भाव नसताना बुलढाणा अर्बन कुठल्याच वेअर हाऊसमधील मालाचा लिलाव करणार नाही, असे बुलढाणा अर्बनचे जनरल मॅनेजर कासाट यांनी सांगितले असताना, याउलट आपलीच मनमानी करणारे शाखा व्यवस्थापक अनिल सावळे हे शेतकर्‍यांना नोटीस मिळाल्याच्या एका दिवसाने कुठल्या नियमानुसार मालाचा लिलाव करणार याबाबत शेतकरी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. या संदर्भात अंढेरा येथील शेतकरी भगवान बनसोडे यांनी बुलढाणा येथील जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे दि.२३ जानेवारी २०२४ रोजी लेखी तक्रार केली असून, संबंधित शाखा व्यवस्थापक अनिल सावळे यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. आता बुलढाणा अर्बन हे मनमानी करणार्‍या शाखा व्यवस्थापक अनिल सावळे यांच्यावर काय कार्यवाही करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!