Breaking newsHead linesMaharashtraPolitical NewsPolitics

आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही; आज मध्यरात्रीपर्यंत मराठ्यांची मुंबईत धडक!

– मनोज जरांगे पाटलांशी राज्य सरकारच्या वाटाघाटी फिस्कटल्या!
– पोलिसांच्या नोटिसीनंतरही आझाद मैदान गाठण्यावर मराठे ठाम!


फसवून झोपेतच सही घेतली; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप
सकाळी कुणीतरी अधिकारी आले आणि झोपेच्या नादात माझी सही घेतली, कोर्टाचे कागदपत्रं असल्याचं सांगत त्यांनी माझी सही घेतली, पण त्याचा दुरुपयोग केला तर गाठ माझ्याशी असल्याचा गंभीर इशारा मनोज जरांगे यांनी केला. लोणावळ्यातून आज मनोज जरांगे हे वाशीकडे निघाले असून पोलिसांनी त्यांना मार्ग बदलण्याची विनंतीही त्यांनी मान्य केली आहे. मनोज जरांगेंचा मुक्काम आज वाशीमध्ये असणार आहे.

मुंबईला जाण्याची हौस नाही, आरक्षण द्या, गावी जातो, परवानगी नाकारतचा मनोज जरांगेंचा पवित्रा

मराठा आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी आझाद मैदानातील उपोषणाला परवानगी नाकारल्यानंतर, मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. कोण म्हणलं नाकारली, परवानगी दिलीय. न्यायालयाने दिलीय, आमचे वकील बांधवही कोर्टात चाललेत, असं मनोज जरांगे म्हणाले. मुंबईला जाण्याची हौस नाही, आरक्षण द्या, गावी जातो, असा पवित्रा मनोज जरांगे यांनी घेतला.


मुंबई (विशेष प्रतिनिधी) – इतर मागास प्रवर्गातूनच (ओबीसी) मराठ्यांना आरक्षण हवे, या मागणीवर मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील हे ठाम असून, आझाद मैदानात उपोषण आंदोलन करण्यास नकार देणारे पत्र तसेच नोटीस आझाद मैदान पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाला बजावली आहे. तसेच, आझाद मैदानाऐवजी खारघरच्या मैदानाचा पर्याय पोलिसांनी मराठ्यांना सूचवला आहे. परंतु, आझाद मैदानातच आंदोलन करण्यावर मराठे ठाम असून, आज (दि.२५) मध्यरात्रीपर्यंत मराठ्यांचे भगवे वादळ नवी मुंबईत धडकणार आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांसमोर कायदा व सुव्यवस्थेचा मोठा पेच निर्माण झाला असून, राज्य सरकारच्यावतीने शेवटचा पर्याय म्हणून तीन जीआर व एक राजपत्र घेऊन एक शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी रवाना झालेले होते. खालापूर किंवा जेथे जरांगे पाटील असतील तेथे हे शिष्टमंडळ भेटणार असून, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. दरम्यान, मराठे आणि ओबीसी या दोन्हीही संघटनांना आझाद मैदानावरील आंदोलनास मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. मराठ्यांसह ओबीसी समाजानेदेखील आझाद मैदानावर आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. दुसरीकडे, आळेफाटा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला मराठा आंदोलकांनी काळेझेंडे दाखवून त्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला असून, काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

मनोज जरांगे पाटलांसह लाखो मराठे मुंबईत धडकणार देण्यास अवघे काही तास उरल्यानंतर राज्य सरकारकडून वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. जरांगे पाटलांना मुंबईबाहेर रोखण्यासाठी सरकार रणनीती आखत असून, दुसरीकडे चर्चादेखील करत आहे. परंतु, आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असा निर्धार जरांगे पाटलांनी सरकारला बोलून दाखविला आहे. या पृष्ठभूमीवर आझाद मैदानावर आंदोलनास पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाला परवानगी नाकारली आहे. याबाबत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. यानंतर मराठा क्रांती मोर्चा आता न्यायालयात जाणार असून, याचिका दाखल करणार आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावरच आंदोलन करण्यावर ठाम आहे. २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची मनाई केली असून, पोलिसांनी मनोज जरांगेंना खारघरमधील जागेचा पर्याय दिला आहे.
राज्य सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा फिस्कटल्यानंतर मनोज जरांगे यांच्यासह मराठ्यांचे भगवे वादळ मुंबईच्या दिशेने येत असून, लोणावळ्याहून सायंकाळच्या सुमारास त्यांनी कूच केली होती. रात्री १२ वाजता हा मराठा मोर्चा वाशी कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी पोहोचणार असल्याची माहिती मराठा मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम यांनी दिली. हा मोर्चा उलवे मार्गे नवी मुंबई महापालिका मुख्यालयाच्या येथून पांभीज मार्गे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे येणार आहे. दरम्यान, मुंबईच्या दिशेने निघालेले मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे पोलिसांनी गुरुवारी दुपारी दिलेल्या नोटीसविरोधात मुंबई हायकोर्टात जाणार नाहीत. कारण यापूर्वीच मराठा आरक्षण आंदोलक मुंबईत व आझाद मैदानात दाखल झालेले असून, पोलिसांनी अवेळी व आयत्यावेळी नोटीस दिली आहे. त्यामुळे मनोजदादा उद्या मुंबईत येतील आणि झेंडावंदन करतील, अशी माहिती आंदोलनाच्या संयोजकांपैकी एक असलेले वीरेंद्र पवार यांनी दिली आहे. आझाद मैदान पोलिसांनी दुपारी जरांगे यांना नोटीस जारी केली होती. या नोटीसमध्ये, ‘आझाद मैदानाची क्षमता ही केवळ पाच ते सहा हजार आंदोलकांना सामावून घेण्याची आहे. मुंबईत इतक्या प्रचंड मोठ्या संख्येने येणार्‍या आंदोलकांना थांबण्यासाठी पुरेशी जागा नाही आणि त्या प्रमाणात सोयी सुविधाही नाहीत. न्यायालयाच्या पूर्वीच्या आदेशाप्रमाणे शिवाजी पार्कचाही उपयोग केला जाऊ शकत नाही. शिवाय, तिथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. मुंबईची भौगोलिक स्थिती, अरुंद रस्ते इत्यादी पाहता हा प्रचंड मोर्चा मुंबईत आल्यास सार्वजनिक सुव्यवस्थेवर विपरित परिणाम होईल. त्यामुळे नवी मुंबई खारघरमधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान आंदोलनासाठी संयुक्तिक राहील. त्यानुसार अर्ज करून रीतसर परवानगी घ्यावी’, असे पोलिसांनी नोटिसीत नमूद केले.
यामुळे जरांगे पाटील हे या नोटीसविरोधात हायकोर्टात धाव घेण्याची चर्चा होती. मात्र, काही वकिलांच्या मदतीने वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर हायकोर्टात जाणार नसल्याचे वीरेंद्र पवार यांनी संध्याकाळी स्पष्ट केले. ‘आम्ही तीन आठवड्यांपूर्वीच आंदोलनाबद्दल माहिती दिलेली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मोर्चा येणार असल्याची पोलिसांना कल्पना होती. तरीही त्यांनी आधी योग्य ती पावले उचलली नाहीत. त्यांनी आता ऐनवेळी व अवेळी नोटीस दिली आहे. आंदोलनात सहभागी आंदोलक यापूर्वीच मुंबईत व आझाद मैदानमध्ये दाखल झालेले आहेत. आझाद मैदान हे आंदोलनांसाठीच राखीव असलेले मैदान असल्याने जरांगे पाटील यांनी शांततापूर्ण आंदोलनासाठी हे ठिकाण निश्चित केले आहे. त्यानुसार ते शुक्रवारी सकाळी मुंबईत दाखल होतील आणि ध्वजारोहण करतील’, अशी माहिती वीरेंद्र पवार यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने सातारा येथून मुंबईत दाखल झाले असून, तीन जीआर व एक राजपत्र घेऊन सरकारचे एक शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी पोहोचलेले आहेत. शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे.


मराठे मुंबईच्या वेशीवर धडकले, सरकार हादरले; चर्चेसाठी हालचाली सुरू!

– मराठवाड्याचे विभागीय आयुक्तांसह शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीला लोणावळ्यात!

– आरक्षण ओबीसीतूनच पाहिजे, गाड्यांची तोंड मुंबईकडेच वळवून ठेवा – जरांगे पाटील

लोणावळा (वैशाली जानभोर/प्रतिक साठे) – मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच केलेले मराठ्यांचे वादळ अखेर मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपले आहे. आज मराठे मुंबईत धडकण्याची शक्यता पाहाता, हादरलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचे योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चेसाठी हालचाली सुरू केल्या असून, जरांगे लोणावळ्यात असल्याने तेथे राज्य सरकारचे दोन शिष्टमंडळ दाखल झालेले आहेत. मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधुकर आर्दड हे जरांगे पाटलांशी सरकारच्यावतीने चर्चा करत आहेत. दरम्यान, शिष्टमंडळाशी चर्चा करतो, पण आरक्षण ओबीसीतूनच पाहिजे, असे जरांगे पाटलांनी सरकारला ठणकावून सांगितले आहे. आमच्या गाड्यांची तोंड मुंबईकडेच वळवून ठेवली आहे. आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही, असे जरांगे यांनी सरकारला नीक्षून सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा बांधव आज मुंबईच्या वेशीवर धडकणार असून, संध्याकाळी लोणावळा येथून मराठा आरक्षण पदयात्रेचा नवी मुंबईत प्रवेश होण्याची शक्यता आहे. भगवे वादळ मुंबईत येऊन धडकण्यापूर्वी राज्य सरकारच्यावतीने जरांगे यांच्याशी चर्चेच्या अंतिम फेरी सुरू झालेल्या आहेत. लाखो मराठे मुंबईत आले, तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती शिंदे-फडणवीस सरकारला आहे. त्यामुळे जरांगे यांनी सरकारला आणखी काही दिवसांचा अवधी देऊन आंदोलन स्थगित करावे, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने राज्य सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीसाठी लोणावळ्यात दाखल झाले होते. यामध्ये मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधुकर अर्दड यांचा समावेश आहे. दरम्यान, जरांगे यांच्या भेटीपूर्वी मधुकर अर्दड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे यांच्या ज्या मागण्या आहेत, त्या मागण्यांच्या अनुषंगाने शासन काम करीत असून, काही महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत, त्यासंदर्भात आम्ही जरांगे यांच्या भेटीसाठी आल्याचे अर्दड यांनी सांगितले.
दरम्यान, मराठे कुणबी आहेत आम्हाला आरक्षण ओबीसीतूनच पाहिजे इतर कोणतेही आरक्षण आम्ही स्वीकारणार नाही. महाराष्ट्र आमचा, मुंबई आमची आता फक्त वाशीचा मुक्काम बाकी मग थेट मुंबई. २६ तारखेला संपूर्ण मराठा समाज मुंबईला येणार, असे जरांगे पाटलांनी सरकारला ठणकावले आहे. तसेच, कार्यकर्त्यांना सूचना देताना, आपल्या आंदोलनात कुणीही जाळपोळ उद्रेक करायचा प्रयत्न केला तर त्याला पळून जाऊ द्यायचे नाही. जो उद्रेक करेल त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात द्या. आपल्या माता माऊल्यांच्या संरक्षणाची आपली जबाबदारी आहे. जातीसाठी कितीही त्रास झाला तरी जागा सोडायची नाही. तुम्हाला जर कुणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मला माहिती द्या, मग मी त्याला दाखवतो. सरकारकडून काही दडपण आणण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही उत्तर देऊ नका, आधी मला विचारा. मुंबईत शांततेत आंदोलन करायचे. एकाच जागी बसून आंदोलन करायचे. सत्तर वर्षांपासून आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत येत नव्हते. ५४ लाख मराठ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या, त्यांच्या परिवाराला तात्काळ प्रमाणपत्र द्या आणि त्यांच्या सग्यासोयर्‍यांना आरक्षण द्या, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत, असे याप्रसंगी जरांगे पाटील म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे लोणावळा येथे पोहोचले आहेत. त्यानंतर ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करत मुंबई गाठणार आहेत. मात्र, जरांगे यांची रॅली मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पोहोचण्यापूर्वीच पोलिसांकडून लोणावळा येथे द्रुतगती मार्गाच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या दोन्ही मार्गांवर कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. जलद कृती दल आणि बॉम्ब निकामी पथकही तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे, मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलकांना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून परवानगी दिली जाणार नसल्याची चर्चा आहे. मनोज जरांगे यांच्या मुंबईकडे जाणार्‍या मराठा आरक्षण रॅलीनुसार मराठा आरक्षण समर्थकांना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने मुंबईकडे जायचे आहे. परंतु, पोलिसांनी त्यांना जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून जाण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे, नवीन मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता जरांगे यांची आरक्षण रॅली कोणत्या मार्गाने जाणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.


सरकारने जर फसवाफसवी केली तर मराठा आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!